एथर एनर्जीची विमा क्षेत्रात एंट्री
उपकंपनीला मंजुरी ः उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होणार
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जीने विमा क्षेत्रात प्रवेश केला. कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी एथर इन्शुरन्स लिमिटेडला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) ‘कॉर्पोरेट एजंट (कंपोझिट)’ म्हणून काम करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे कंपनीला जीवन, आरोग्य आणि सर्वसाधारण विमा व्यवसायाचे वितरण व सेवा देता येणार आहे. गुरुवारी (ता. १५) हे प्रमाणपत्र मंजूर झाल्याची माहिती अथर एनर्जीने दिली.
या परवानगीमुळे कंपनीला सध्याच्या ग्राहकवर्गाचा आणि विक्री भागीदारांच्या नेटवर्कचा उपयोग करून उत्पन्नाचे नवे आणि नियमित स्रोत निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ग्राहकांना विमाविषयक सेवा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. आयआरडीएआयच्या कॉर्पोरेट एजंट नोंदणी नियमांनुसार मिळालेले हे प्रमाणपत्र वार्षिक शुल्क भरत राहण्याच्या अटीवर लागू राहणार आहे. नियामक प्राधिकरणाकडून ते स्थगित किंवा रद्द केले जाईपर्यंत त्याची वैधता असेल. एथर एनर्जीने याबाबतची माहिती राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराला कळविली आहे.
विद्यमान ग्राहकवर्गातून रिकरिंग रेव्हेन्यू
या नव्या परवान्यामुळे एथर एनर्जीला देशभरात एथरच्या इलेक्ट्रिक दुचाकींची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मजबूत नेटवर्कचा लाभ घेत कंपनीला विम्याच्या माध्यमातून रिकरिंग रेव्हेन्यू मिळवणे सोपे होणार आहे. केवळ दुचाकी विक्रीवर अवलंबून न राहता सेवा क्षेत्राच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
एकाच छताखाली मिळणार विमा सेवा
एथरच्या शोरूम्स आणि रिटेल पार्टनर्सच्या माध्यमातून वाहन खरेदी करतानाच ग्राहकांना गाडीचा विमा, आरोग्य आणि जीवन विम्याचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होतील. यामुळे ग्राहकांचा खरेदी अनुभव अधिक सुलभ होईल. ईव्ही क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या काळात वित्तीय सेवांमध्ये उतरून ग्राहकांशी दीर्घकालीन नाते जोडण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.