अतनूर आरोग्य केंद्रात सुरक्षारक्षक तैनातीची मागणी
---
रुग्णकल्याण समितीच्या बैठकीत विविध ठरावांना मंजुरी
-----
जळकोट शहर, ता. ९ (बातमीदार) ः अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णकल्याण समितीची बैठक पार पडली. यात आरोग्य केंद्रातील प्रलंबित विकासकामे, रुग्णांच्या सोयी-सुविधा व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी वैद्यकीय अधिकारी तथा समितीचे सचिव डॉ. सकलेन शेख यांनी मागील बैठकीचा आढावा आणि खर्चाचा ताळेबंद सादर केला. अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत पाच उपकेंद्रांत दररोज १०० ते १५० रुग्णांची ओपीडी होत असल्याने आवश्यक सुविधांवर चर्चा झाली. ऑपरेशन थिएटरमधील त्रुटी, औषधसाठा कक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची आसनव्यवस्था व प्रवेशद्वारासमोरील छताच्या कामाबाबत सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांना रुग्णाच्या नातेवाइकांनी अरेरावी केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रात तातडीने सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
जि.प.सदस्या शांताबाई अदावळे व त्यांचे प्रतिनिधी रमण अदावळे यांनी पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत आरोग्य समितीचे पदाधिकारी, अशासकीय सदस्य व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख सकलेन बनुद्दिन, डॉ. भक्ती शशिकांत म्हेत्रे आदी उपस्थित होते.