
औरंगाबाद : थ्रीडी प्रिंटिंगने दिली व्यवसायाची दिशा
औरंगाबाद : सध्याचा जमाना नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि थ्रीडी प्रिंटिंगचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय, संशोधन, ज्वेलरी, वाहन उद्योग, कृषी, संरक्षण आदी क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या तंत्रज्ञानातून गुंतागुंतीची, क्लिष्ट आणि नाजूक वस्तू अथवा विशिष्ट भागाची निर्मिती करता येते. एखादी हुबेहूब प्रतिकृती केली जाते. अतिशय कमी किमतीत जास्त वस्तूंचे उत्पादन करता येते. भविष्यातील याच मार्केटचा अभ्यास करून येथील अमेय देशपांडे या तरुणाने थ्री डी प्रिटींग मध्ये ग्राउंड अप टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ नावाने स्टार्टअप सुरु केले आहे.
फिजिक्स, केमिस्ट्रीत आवड असताना अमेय देशपांडे याने इंजिनिअरिंगमध्येच जाण्याचे ठरविले होते. त्यानुसार तो बी. टेक. (नॅनोटेक्नॉलॉजी) झाला. शिक्षण घेत असताना त्याला थ्रीडी प्रिंटिंग विषयी माहिती झाली. शिक्षणादरम्यान सोलर सेलचे प्रोजेक्ट होते. प्राध्यापकांनी त्याचे थ्रीडी प्रिंटिंग मॉडेल तयार त्याला सांगितले होते. त्यानंतर अमेयने आयआयटी मुंबई येथील निमो लॅबमध्ये स्वतः थ्रीडी प्रिंटिंग केले. यानंतर २०१८ मध्ये त्याने केमिस्ट्री लॅबसाठी साहित्य तयार करणाऱ्या कंपनीत एक वर्ष नोकरी केली. तेथेही त्याला थ्रीडी प्रिंटिंग शिकता आले. नोकरीदरम्यान त्याने पैशांची बचत केली आणि २०१९ मध्ये स्वतःचे थ्रीडी प्रिंटर खरेदी कला.
फेशशिल्ड निर्मिती
कोरोनामुळे लॉकडाउन लागले तेव्हा अमेय चेन्नईत होता. लॉकडाउन काळात काय करावे, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यामुळे त्याने फेशशिल्डचे ४० ते ५० प्रकार बनविले. यासाठी त्याने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर चर्चा केली. त्यातून एक फेसशिल्ड अंतिम केली. या फेसशिल्डचे त्याने दहा दिवसात तीन हजार थ्रीडी प्रिंटिंग तयार केली. यात नष्ट करता येतील आशा आणि पुन्हा वापरता येतील अशा फेशशिल्ड होत्या. लॉकडाउनच्या काळात त्याने चार मित्रांच्या मदतीने तब्बल दोन लाख फेशशिल्ड तयार केल्या. विदेशातूनही मागणी आली. त्याने अमेरिका, जर्मनीतही ५० हजार फेशशिल्ड पाठविल्या.
इंडस्ट्रीमधील थ्रीडी प्रिंटिंगवर भर
लॉकडाउन संपल्यानंतर अमेय औरंगाबादेत आला. २०२० मध्ये त्याने ग्राउंड अप टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ नावाने कंपनी नोंदणी केली. यानंतर ‘मॅजिक’च्या इनक्युबेशन सेंटर’मध्ये त्याला मार्गदर्शन मिळाले. कंपनी स्थापनेनंतर त्याने इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या थ्रीडी प्रिंटिंगवर सर्वाधिक भर दिला. यासाठी कंपन्या त्याला फाइल देतात, त्याप्रमाणे तो थ्रीडी प्रिंटिंगमध्ये पार्ट तयार करून देतो. उदाहरण घ्यायचे झाले तर कार्बन फायबर, ग्लास फायबर तसेच इलेक्ट्रीक वाहनांसाठी लागणारे बॅटरी होल्डर, टेलिस्कोप लेन्स कव्हर, लाइट डिफ्युजर, प्रोटोटाईप, गिअर मॅकेनिझम, बॅच प्रॉडक्शन ऑफ टाइल्स, हाय व्होल्टेज स्पेसर, ग्लॉस फायबर पार्ट, हाय टेंपरेचर फायबर पार्ट, टाईल प्रोटोटाईप, हाय टेंपरेचर कार्बन फायबर पार्ट फॉर ऑटोमोटिव्ह कंपनी, असे विविध पार्ट सध्या तो तयार करून देतो. पार्ट तयार करून देताना तो थ्रीडी प्रिंटर तयार करत आहे. यासाठीचे निम्मे साहित्य चीनमधून मागवावे लागते. थ्रीडी प्रिंटरसाठी लागणाऱ्या प्लेटही तो तयार करतो.
जागतिक बाजारपेठ
जगाचा विचार केला तर २०२० मध्ये थ्रीडी प्रिंटिंगची जागतिक बाजारपेठ १३.७ अब्ज डॉलर होती. भविष्याचा विचार केला तर २०२६ मध्ये ती ६३.४६ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह देशात थ्रीडी प्रिंटिंगमध्ये चांगली संधी आहे, याचा अभ्यास अमेयने केला व तो या क्षेत्रात आला.
काय आहे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान?
अॅडीटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (एएम) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पदार्थांची त्रिमितीय रचना साकारल्या जातात. ज्यामध्ये संगणकाच्या माध्यमातून द्रव पदार्थांच्या कणांना एकत्र करून विशिष्ट रचना अथवा वस्तू साकारली जाते. एक प्रकारे कागदावरील प्रिंटिंगऐवजी वस्तूंचेच त्रिमितीय प्रिंटिंग केले जाते.
Web Title: Aurangabad 3d Printing Useful To Business Grow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..