Aaditya Thackeray News: आमच्या मनात जनता, त्यांच्याकडे खोके; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका | Shivsena News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray News

Shivsena News: शिवसंवाद यात्रेदरम्यान जिथे गेलो तिथे गर्दी होत आहे. आमच्या मनात जनतेचा विचार असल्यामुळे हे प्रेम मिळत आहे; पण त्यांच्या मनात फक्त खोक्यांचा विचार आहे.

Aaditya Thackeray : आमच्या मनात जनता, त्यांच्याकडे खोके; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

औरंगाबाद - शिवसंवाद यात्रेदरम्यान जिथे गेलो तिथे गर्दी होत आहे. आमच्या मनात जनतेचा विचार असल्यामुळे हे प्रेम मिळत आहे; पण त्यांच्या मनात फक्त खोक्यांचा विचार आहे.

खुर्चीसाठीच त्यांनी गद्दारी केली, अशी टीका युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेता महाराष्ट्रात लोकशाही पायदळी तुडविली जात आहे. सकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, असेही ते म्हणाले.

शिवसंवाद यात्रेनिमिमित्त बुधवारी रात्री गजानननगर भागात झालेल्या सभेत ते बोलत होते.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर माजी नंदकुमार घोडेले, माजी सभापती राजू वैद्य, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, उपजिल्हा प्रमुख अनिल पोलकर आदी उपस्थित होते.

अंबादास दानवे यांच्या निधीतून पाच कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन ठाकरेंच्या हस्ते झाले.

ठाकरे म्हणाले, राज्यात महापालिकेच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीत? कोरोना संपल्यामुळे आता त्या घ्यायला अडचण नाही.

तरीही घटनाबाह्य सरकार त्या लांबणीवर टाकत आहे. आज निवडणुका झाल्या तर त्यांचा पराभव होणार हे त्यांना ठाऊक आहे, म्हणून त्यांच्यात सध्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. येथील गर्दीचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, सभा इकडेही आणि तिकडेही होत आहेत, पण इथे माणसांची गर्दी आहे, तिकडे फक्त रिकाम्या खुर्च्यांचीच गर्दी आहे.

गद्दारांना केवळ खुर्च्याच दिसत होत्या. म्हणून त्यांनी गद्दारी केली. पण आज त्यांच्या वाट्याला रिकाम्या खुर्च्याच येत आहेत. इथेही पाच आमदारांनी गद्दारी केली, पण पुढच्या निवडणुकीत दुप्पट आमदार निवडून आणण्याची ताकद जनतेला मला दिली आहे, निवडणुका होतील तेव्हा गद्दारांना जागा दाखला, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सभेची नियोजित वेळ साडेसात होती. ठाकरे येण्यासाठी रात्रीचे ९.३५ झाले होते. त्यांनी ११ मिनिटांत भाषण संपवले. त्यासाठी नागरिकांना दोन तासांपेक्षा जास्तवेळ ताटकळावे लागले.

‘गद्दारांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवावी

घनसावंगी - राज्यातील सरकार हे लोकशाहीला विरोध करून आलेले गद्दारांचे सरकार आहे. त्यांनी संविधानाचा अपमान केला आहे. पक्ष सोडून गेलेल्या आमदार, खासदारांनी पदांचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी पुन्हा दिले. मंगूजळगाव (ता. घनसावंगी) येथे संवाद साधताना ते बोलत होते.

ते म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात विनाअट शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. आता अटी व शर्तीच्या अधीन राहून कर्जमाफी करण्यात आली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा आपण केली, मात्र सरकार बदलल्यानंतर ती बारगळली. कृषिमंत्री बांधावर, शेतावर आले नाहीत.

त्यांना शेतीतील काहीच माहिती नाही. त्यांना केवळ खोक्‍यात रस आहे. आमचे सरकार असताना परदेशातील गुंतवणूकदार विश्‍वासाने राज्यात आणले होते. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे केवळ काही तास थांबले. त्यांच्यासाठी ४० कोटींचा खर्च झाला.

गुंतवणूक किती आणली? हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे आहेत, असा सवाल त्यांनी केला. खासदार संजय जाधव, लक्ष्मण वडले, ए.जे.बोराडे, भास्कर अंबेकर, संतोष सांबरे, डॉ. हिकमत उढाण आदी उपस्थित होते.