औरंगाबाद : मिरचीचे पीक सापडले संकटात

बळिराजा हवालदिल : पावसाच्या अभावामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव
Aurangabad Chilli Crop
Aurangabad Chilli Crop
Updated on

चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजीसह (ता.कन्नड) परिसरातील लागवड केलेल्या पूर्व हंगामी मिरचीवर विषाणूजन्य संसर्ग (व्हायरस) पसरला आहे. त्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे मिरचीचे पीक संकटात सापडले आहे. यामुळे बळिराजाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

गेल्या सहा सात वर्षापासून चिंचोली लिंबाजी परीसरातील शेतकरी पूर्व हंगामी मिरची लागवड करीत आहे. नगदी पीक व ऐन पेरणीत पैसा हाती येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळले आहे. ऐन कडक उन्हाळ्यात वेगवेगळ्या जातीची मिरची लागवड करून त्यास मल्चिंग पेपरचा वापर, महागडी विद्राव्य खते, फवारण्या असा मोठा खर्च करून जून महिन्याच्या सुरवातीपासून काही शेतकऱ्यांच्या मिरचीचा तोडा होतो. यातून बऱ्यापैकी पैसा हाती येतो.

मात्र, यावर्षी जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने काही प्रमाणात मिरचीचे क्षेत्र संकटात सापडले. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी होते अशा शेतकऱ्यांच्या मिरच्या जगल्या तर काहींच्या पाण्याअभावी सुकल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध पाणी आहे अशा क्षेत्रातील मिरचीस मागील पंधरा दिवसापासून पावसाच्या अभावामुळे विषाणूजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील संपूर्ण मिरचीचे क्षेत्र संकटात सापडल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

काही शेतकऱ्यांना एखाद्या दोन तोड्यातून थोडा बहूत पैसा हाती आला तर काहींचा लागवड, मशागत, खते, फवारण्या याचा संपूर्ण खर्च अंगलट आला आहे. शेलगाव, वाकद, दिगाव येथील काही शेतकऱ्यांनी मल्चिंग वरील मिरची काढून रान मोकळे केले आहे. त्या मल्चिंगवर वेगळे पीक घेण्यास प्राधान्य दिले असल्याचे परिसरात चित्र आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे

  • बायोमिक्सची फवारणी व ड्रेंचिंग करावी.

  • फवारणीसाठी २०० मि.ली. बायोमिक्स १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • ड्रेचिंगसाठी प्रति एक एकर साठी ५ लिटर बायोमिक्स वापरावे. या बायोमिक्समध्ये ट्रायकोडर्मा मेटारायझियम, शीडोमोनास व बिवेरिया इत्यादी जैविक घटकांचा समावेश असतो. सदरचे बायोमिक्स एनएआरपी पैठण रोड (औरंगाबाद) या ठिकाणी उपलब्ध आहे.

मिरची पिकावर व्हायरस येत असतो. परंतु यावर्षी झाडाच्या कमी वयातच याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असल्याने परीसरातील मिरची संकटात आहे. एखादा चांगला पाऊस झाल्यास यात थोडीफार सुधारणा होवू शकते. पाऊस नसल्याने याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे.

- ज्ञानेश्वर सोळुंके (शेतकरी)

पावसाच्या अभावामुळे परीसरातील मिरची संकटात सापडली असून शेतकऱ्यांची अपेक्षा संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता या मिरचीच्या उत्पन्नातून मोठा लाभ होईल असे वाटत नाही.

- मेघश्याम देशमुख (शेतकरी)

पावसाचा अभावामुळे मिरचीचे काही क्षेत्र अडचणीत आले परंतु शेतकऱ्यांनी मिरची रोप निवड करताना काही चुकीच्या नर्सरीतून रोपे खरेदी केले. त्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता या रोगाच्या नियंत्रणाबाबत विद्यापीठाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.

- बाळराजे मुळीक (तालुका कृषी अधिकारी, कन्नड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com