Aurangabad : लोकसहभागातून उभे राहतेय ‘शिक्षणाचं मंदिर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambelohal zilla parishad school

Aurangabad : लोकसहभागातून उभे राहतेय ‘शिक्षणाचं मंदिर’

औरंगाबाद : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा अर्थ अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथील गावकऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. गावकरी व शिक्षकांनी गावातील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला अन् जिद्दीने तो प्रत्यक्षात उतरवलादेखील. १ कोटी ५ लाखांच्या निधीतून अंबेलोहळ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचे मंदिर’ उभारले जात आहे. अर्थात यात जानकीदेवी बजाज कंपनीचेही मोलाचे आर्थिक सहकार्य मिळाले. यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय टळली.

जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात सुमारे ७ हजार लोकसंख्या असलेले अंबेलोहळ गाव. येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मागील अनेक वर्षांपासून शिक्षणाची गैरसोय होत होती. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या हजाराच्या आसपास असून गुणवत्ता अतिशय चांगली आहे.

नवोदय, स्कॉलरशिप आणि शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी येथील विद्यार्थी पात्र ठरतात. फक्त अडचण होती ती शाळेच्या इमारतीची. पत्र्याच्या वर्गखोल्या असल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना उन्हाळा, पावसाळा या ऋतूत समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पावसाळ्यात छताची गळती; तर उन्हाळ्यात पत्रे तापल्यामुळे उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षक व गावकऱ्यांनी जानकीदेवी बजाज कंपनीकडे प्रस्ताव मांडला. कंपनीने सीएसआर फंडातून शाळेसाठी नवी इमारत उभारण्याचे आश्वासन दिले. नवीन दुमजली इमारतीसाठी खर्च मोठ्या प्रमाणात येणार असल्याने लोकसहभाग महत्त्वाचा होता. यासाठी शिक्षकांनी स्वतःपासून सुरवात केली.

प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले, त्यानंतर गावकऱ्यांनीदेखील पाचशेपासून ५० हजारांपर्यंत मदत केली. आसपासच्या गावांतील पालकांनी देखील स्वखुशीने निधी दिला. बघता बघता १० लाख ५० हजार रुपये जमा झाले. सध्या शाळेच्या इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. शिक्षकांसह गावकरीही एकजुटीने काम करीत आहेत. पुढील दोन महिन्यांत इमारतीचे काम पूर्ण होणार असल्याचे मुख्याध्यापिका अनिता व्याहाळकर यांनी सांगितले.

अशी असेल नवीन इमारत

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नवीन इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. एकूण १० वर्गखोल्या असलेल्या या प्रशस्त इमारतीमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, संगणक खोली, प्रयोगशाळा, ग्रंथालयाची उभारणी करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष कृतीचे महत्त्व

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था...विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ...शासनाचे दुर्लक्ष...अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. एवढेच काय, तर शाळेला इमारत नाही म्हणून जिल्हा परिषदेत गावकऱ्यांनी ‘शाळा’ भरविल्याच्या बातम्याही सचित्र पहायला, वाचायला मिळतात. पण असे करून प्रश्‍न सुटतो का? तर बहुतांशवेळा याचे उत्तर नाही असेच येते. यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली, प्रश्‍न सोडविण्यात सहभाग घेतला तर सुखद चित्र पहायला मिळेल. अंबेलोहळच्या गावकऱ्यांनी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

शासनाकडून एकाच वेळी शाळेची इमारतीसाठी निधी दिला जात नाही. केवळ वर्गखोल्यांसाठी निधी दिला जातो. त्यामुळे लोकसहभागातून शाळेची इमारत बांधण्यासाठी आम्ही जानकीदेवी बजाज कंपनीकडे प्रस्ताव दाखल केला. त्यात दहा टक्के लोकसहभाग टाकून शाळेची इमारत उभी राहात आहे.

-प्रशांत हिवर्डे,माध्यमिक शिक्षक, अंबेलोहळ

Web Title: Aurangabad Ambelohal Zilla Parishad School Built Public Participation Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..