
Aurangabad Crime News: लेकीच्या संसारासाठी पित्याने जावयाची घातली होती समजूत
Aurangabad Crime News : लेकीने ‘त्याच्या’शी प्रेमविवाह केला, काही दिवसांनी तो तिला चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करु लागला, दरम्यान लेकीचा संसार मोडू नये म्हणून अनेकदा ‘ती’च्या वडीलांनी आरोपी जावयाला अनेकदा समजावून सांगितले.
मात्र त्याने शेवटी लेकीलाच संपविले. सातारा परिसरात तीन साडेतीन वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार ९ जानेवारीच्या मध्यरात्री समोर आला.
आरोपी पतीसह त्याच्या आईला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, दोघा आरोपींना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
समीर विष्णू म्हस्के (३०) असे त्या पतीचे तर सुनीता विष्णू म्हस्के (५२, रा. दोघेही भाग्यनगर) असे आरोपीचे नाव आहे.
मृत आरती ही समर्थनगरातील एका रुग्णालयात काम करत होती, तर पती समीर हा काहीच कामधंदा करत नसे. आरती आजारी असल्याने तिला चार जानेवारीरोजी संध्याकाळी समीरने भाग्यनगरातच राहणाऱ्या तिच्या वडिलांकडे आणून सोडले होते.
आरतीच्या काकीने तिला दवाखान्यातही नेले. दोन दिवस आराम केल्यानंतर ती दवाखान्यातील कामावर गेली. त्याच दिवशी आरोपी पती समीर याने ती काम करत असलेल्या दवाखान्यात जाऊन तिच्याशी वाद घातला होता.
त्यानंतर मात्र समीर आजारी पडल्याने घाटीत उपचारासाठी दाखल झाला होता. ही बाब आरतीला समजताच तीने वाद बाजूला ठेऊन त्याला पाहण्यासाठी घाटीत धाव घेतली होती.
पतीने उपचार घेतल्यानंतर ९ जानेवारीला तिला तो कांचनवाडीतील घरी घेऊन गेला आणि भल्या पहाटे झोपेतच तिच्यासह अडीच वर्षीय निशांतचाही गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.