esakal | धक्कादायक! १० ते १६ वर्षांची मुलं स्टीक फास्ट, व्हाइटनरच्या व्यसनाच्या आहारी

बोलून बातमी शोधा

aurangabad important news

ही नशा तब्बल दोन ते तीन तासापर्यंत राहते, याची नशा केल्याने इतर आमली पदार्थांप्रमाणे याचा वास येत नसल्याने बिनधास्तपणे याचे सेवन केले जात आहे

धक्कादायक! १० ते १६ वर्षांची मुलं स्टीक फास्ट, व्हाइटनरच्या व्यसनाच्या आहारी
sakal_logo
By
मुनाफ शेख

आडुळ (औरंगाबाद): गेल्या अनेक दिवसांपासून आडुळसह (ता.पैठण) परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांसह शाळा बाह्य १० ते १६ वयोगटातील चिमुकली मुले स्टीक फास्ट, व्हाइटनर पासून होणाऱ्या नशेच्या आहारी गेले असल्याचे दिसत आहे. ही लहान मुले दररोज निर्मनुष्य ठिकाणी जाऊन तीन- चार जणांच्या ग्रुपने एकांतात बिनधास्तपणे "दम मारो दम, मिट जाये गम" म्हणत नशेच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहेत.

ही नशा करणाऱ्या चिमुकल्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना यातून मुक्त करणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थी ही या नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव आडुळ येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक कैलास वाढवे, अनिल चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले. त्यांनी जे विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेले त्यांच्या पालकांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून देऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.

दुर्दैवी! दोस्ती संपली, परीक्षेला जाताना दोघांचा मृत्यु

यानंतर सदरील प्रकरणाबाबत "सकाळ" ने शाळेत व शाळेबाहेर याबाबतची पडताळणी केली असता जे विद्यार्थी नशा करीत होते त्यांच्याशी चर्चा केली असता भयानक सत्य समोर आले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, दहा रुपयांत स्टीक फास्टची लहान बाटली कोणत्याही किराणा किंवा जनरल स्टोअर्सवर सहज उपलब्ध होते. विशेष म्हणजे जो दुकानदार या बाटलीची विक्री करतात त्यांना माहिती असते ही बाटली कशासाठी घेत आहे तरी देखील हे दुकानदार सहज बाटली देतात. बाटली घेतल्यानंतर त्याला एका प्लास्टिक पिशवीत टाकले जाते व त्याचा गॅस निघण्याअगोदर त्याला तोंडात घेऊन गॅस पोटात ओढला जातो. काही मिनिटांतच गांजा, दारुप्रमाणे नशा येण्यास सुरुवात होते.

ही नशा तब्बल दोन ते तीन तासापर्यंत राहते. याची नशा केल्याने इतर आमली पदार्थांप्रमाणे याचा वास येत नसल्याने बिनधास्तपणे याचे सेवन केले जात आहे. काही विद्यार्थ्यांनी तर असं सांगितले की येथील किराणा दुकानदार स्टीक फास्ट बाटली सह प्लास्टिक पन्नी देखील देतात. त्यामुळे नफ्याच्या नादात आंधळे झालेल्या स्टीक फास्ट विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि पालकांतून होत आहे.

पंकजा म्हणतात, 'संजय राठोडनंतर आता धनंजय मुंडेंनीही राजीनामा दिला पाहिजे...

हा प्रकार गेल्या पाच सहा वर्षांपासून सुरु असून अनेक चिमुकली मुले या नशेच्या आहारी जात आहे. आम्ही स्वतः हा नशा करताना विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्या पालकांना सुचना दिल्या आहेत- कैलास वाढवे (शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, आडुळ)

पालकांच्या दुर्लक्षामुळे प्रमाण वाढले-
आपल्या मुलांची शाळा किती वाजता भरते, कितीला सुटते, शाळेतून आल्यानंतर मुले राञी उशिरा का घरी येतात, मुलगा शाळेत गेला की दुसरीकडेच फिरत आहे याबाबत विचारपूस न करणे यामुळे मुलांना मोकळीक मिळत असल्याने ते नशेच्या आहारी जात आहेत, असा निष्कर्श समोर आला आहे. 

स्टीक फास्ट सारखा शरीराला घातक पदार्थ सेवन केल्याने फुफ्फुसावर परिणाम होऊन कॅन्सरसारख्या आजाराचा धोका संभावतो. शिवाय ह्रदय, मेंदु, किडनी निकामी होण्याचा अधिक धोकाही असतो. हा पदार्थ उत्तेजित असल्याने मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे, एकाकीपणा, चिडचिडपणा वाढतो- सुधाकर शेळके (जिल्हा आरोग्य अधिकारी)

(edited by- pramod sarawale)