esakal | कडक लॉकडाऊमुळे मजूर, कामगार परतीला; 'सचखंड एक्स्प्रेस'ला तुडूंब गर्दी

बोलून बातमी शोधा

null
कडक लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार परतीला; 'सचखंड एक्स्प्रेस'ला तुडूंब गर्दी
sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मराठवाड्यात विविध ठिकाणी असलेल्या विविध राज्यातील कामगार, मजूरांनी गावाचा रस्ता धरला आहे. गुरुवारी (ता. २२) रेल्वेस्थानकावर सचखंड एक्स्प्रेसला अन्य राज्यातील कामगारांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने ’ब्रेक द चेन’अंतर्गत विविध निर्बंध लावले आहेत. सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता अन्य सेवा बंद आहेत. त्यातच राज्य शासनाने १ मे पर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळेच कामगार व मजूरांनी परतीची वाट धरली आहे.

हेही वाचा: आम्ही काय पाकव्याप्त काश्मिरात राहतो का? रेमडेसिविरवरुन सुरेश धस संतप्त

गेल्या लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक वसाहतीत विविध कारखान्यात काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुर, कामगारांना अडकून पडावे लागले होते. शासनाने विविध अटी-शर्ती आणि वैद्यकीय तपासणी यांच्या सोपस्कार पार पडल्यानंतर अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिली होती. यावेळी मात्र काय परिस्थिती निर्माण होईल. याबाबत साशंकता आहे. त्यातच सध्या हाताला काम नाही, जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच कामगार व मजूरांनी कुटूंबासह आपल्या गावी जाण्याचा रस्ता धरल्याचे चित्र गुरुवारी (ता.२२) दिसून आले. शहरातील व परिसरातील शेकडो मजूरांनी आपल्या कुटूंब व संसारासह सचखंड एक्स्प्रेसने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच रेल्वेस्थानकावर तुडूंब गर्दी झाली होती.