Aurangabad : बसडेपोसाठी पाहावी लागणार मेची वाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Bus Stand

Aurangabad : बसडेपोसाठी पाहावी लागणार मेची वाट

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत जाधववाडी भागात उभारण्यात येणाऱ्या शहर बससाठीच्या डेपोचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत १०० बसची खरेदी करण्यात आली आहे. या बस एसटी महामंडळाच्या चिकलठाणा येथील आगारात सध्या उभ्या केल्या जातात. पण आगामी काळात शहर बससाठी स्वतंत्र बस डेपो उभारला जाणार आहे. शहर बसच्या ताब्यात लवकरच ३५ ई-बस दाखल होणार आहेत. या १३० बसची देखरेख व पार्किंगसाठी स्मार्ट सिटीतर्फे जाधववाडी येथे सात एकरच्या जागेवर आधुनिक बस डेपो तयार करण्यात येत आहे.

शनिवारी (ता. १७) डॉ. चौधरी यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी कंत्राटदाराने त्यांना सांगितले की, बस डेपोच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. या बस डेपोमध्ये २५० डिझेलवर चालणाऱ्या बस तर ५० इलेक्ट्रिक बसच्या पार्किंगची सोय होईल. जागेला कव्हर करण्यासाठी ७५० मीटर लांब व आठ उंच काँक्रिट कंपाउंड वॉल बांधण्यात येणार आहे.

भिंतीच्या आत हरित पट्ट्यासाठी तीन मीटरचा बफर असेल. डेपोमध्ये चार मेंटेनन्स बे असतील. त्यात स्वयंचलित बस वॉशिंग सिस्टम असेल. १४३५ चौरस मीटर क्षेत्रफळावर कार्यशाळा व प्रशिक्षणासाठी इमारत बांधली जाणार आहे. प्रशासकीय कार्यालय, मेकॅनिक, चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष आणि मुख्य चालन व्यवस्थापकाचे कार्यालय असेल. इमारत ग्रीन बिल्डिंग मानकांवर बांधली जाईल. त्यावर डॉ. अभिजित चौधरी यांनी मे किंवा जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

काळी माती सफारी पार्कमध्ये जाणार

याठिकाणी खोदकामातून निघालेली काळी माती सफारी पार्क भागात वृक्षारोपण करण्यासाठी पाठवण्याचे आदेश डॉ. चौधरी यांनी दिले. यावेळी स्मार्ट सिटीचे सिटी बस मुख्य चालन व्यवस्थापक डॉ. राम पवनिकर, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, सहायक प्रकल्प व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे व बस विभागचे सहायक व्यवस्थापक (लेखा) माणिक नीला उपस्थित होते.