
औरंगाबाद : चिमुकल्यांचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप
वैजापूर : पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून जीवे मारणाऱ्या बापाला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
संतोष कचरू वाळुंजे (वय ४०, रा. गल्लेबोरगाव, ता.खुलताबाद) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, २९ डिसेंबर २०१८ रोजी वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथील बापूसाहेब पवार यांच्या शेतातील गट क्रमांक २ मधील विहिरीमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. घटनेची माहिती वीरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.
घटनेचा तपास सलग तीन दिवस करीत वीरगाव पोलिसांच्या पथकाने नगरसह वैजापूर कन्नड व खुलताबाद तालुक्यांतील गावे पिंजून काढली होती. दरम्यान, एका मृत मुलाच्या शर्टवर नगर येथील यशश्री प्ले ग्रुप अँड नर्सरीचा लोगो आढळून आल्याने ही मुले नगर जिल्ह्यातील असावीत, असा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी नगर जिल्ह्यात जाऊन त्यांचा शोध घेतला. मात्र, या लोगोमुळे पोलिसांचा तपास भरकटला होता. पोलिस मृत मुलांचे छायाचित्र गावोगावी दाखवून त्यांची नावे व मारेकऱ्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, ही मुले खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील असल्याची व त्यांची नावे गणेश वाळुंजे (वय ४) व कृष्णा वाळुंजे (वय ३) अशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलिसांनी गल्लेबोरगाव गाठून चिमुकल्यांचा बाप संतोष वाळुंजे याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संतोष हा कन्नड तालुक्यातील शेवता गावी पाहुण्यांच्या शेतात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी शेतात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर ''मीच मुलांना विहिरीत ढकलून मारले'' अशी कबुली दिली.
याप्रकरणी १ जानेवारी २०१८ रोजी संतोष वाळुंजे याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्ह्याचा निकाल देताना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम मोहियोद्दीन एम. ए. यांनी आरोपीस मुलांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील रवींद्रसिंह देवरे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून रावसाहेब रावते व बर्डे यांनी त्यांना सहकार्य केले.
Web Title: Aurangabad Child Murder Case Life Imprisonment For Father Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..