
औरंगाबादेत पाणीप्रश्न गंभीर; आठवड्यातून फक्त 45 मिनिटं पाणीपुरवठा
औरंगाबाद : आज औरंगाबादेत भाजपाने जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न बिकट असून आठवड्यातून एक दिवस फक्त ४५ मिनिटांसाठी पाणी येते. त्यामुळे मोठ्या पाणीटंचाईचा सामना सध्या औरंगाबादकरांना करावा लागत आहे. त्याचबरोबर भाजपा यासाठी मोर्चा काढणार असून शिवसेना भाजपाला विरोध करताना दिसत आहे.
(Aurangabad City Water Crisis)
औरंगाबाद शहराची लोकसंख्या सध्या १६ ते १८ लाखांच्या घरात आहे. शहरासाठी दररोज साधारण २०० ते २२० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. पण सध्या शहरासाठी फक्त १२५ ते १४० दशलक्ष पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागताना दिसत आहे. दरम्यान शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जुन्या झाल्याने मर्यादित क्षमतेत पाणीपुवठा केला जात असल्याचं सांगितलं जातंय. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
हेही वाचा: औरंगाबादमध्ये बॅनर वॉर; भाजपच्या मोर्चाचे बॅनर अज्ञातांनी फाडले
भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असल्याने पाणीबाणीची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दर पाच तर काही ठिकाणी दर आठ दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील सिडको, हडको या भागात पाण्याची टंचाई अधिक तीव्र असल्याचं पाहायला मिळतंय. सध्याची ओरड लक्षात घेता ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा वाढवण्यात आला असून शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना रद्द झाल्याने शहर १० वर्षे मागे गेल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून दिवसभरात टँकरच्या ४०० फेऱ्या कराव्या लागत आहेत. दरम्यान पाण्याच्या टाक्यामध्येच पाणी नसल्याची परिस्थिती औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहे.
शहरातील या पाणीटंचाईमुळे भाजपाच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. त्याअगोदर भाजपा शिवसेनेमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळालं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यादृष्टीने या आंदोलनात भाजप कोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहे ते पहावं लागणार आहे.
Web Title: Aurangabad City Water Crisis Weekly 45 Minute Water Supply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..