औरंगाबाद : कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad city water supply issues water bill retun to citizen MP Imtiyaz Jaleel demand

औरंगाबाद : कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करा

औरंगाबाद : मनपाने औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करून सद्यःस्थितीत नागरिकांकडे थकीत असलेली पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे पत्राद्वारे केली.

महापालिका प्रशासकांना लिहिलेल्या पत्रात इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, औरंगाबाद शहराला वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेकवेळा निवेदने, लोकशाही मार्गाने आंदोलने तसेच आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाक्यांवर सुद्धा आंदोलने केलेली आहेत. महानगरपालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता असताना त्यावेळी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत, स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमकपणे मुद्दा उचलून अनेक आंदोलने केली होती. तसेच थेट लोकसभेत सुद्धा औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व मुबलक पाणीपुरवठा करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तरी सुद्धा मनपा व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही.

फक्त महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी ५० टक्के माफ करण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु उर्वरित ५० टक्के पाणीपट्टी वसुली करून सुद्धा पाणी मिळणार नाही हे विशेष.

औरंगाबाद शहरात पाण्याचे नियोजन होऊन सर्वांना समान प्रमाणात मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने समांतर जलवाहिनी योजना मंजूर केली होती. महानगरपालिकेने योजनेचे काम स्वतः अथवा कोणत्याही खासगी कंपनीद्वारे करू नये म्हणून मी व माझ्या पक्षाने आक्रमकपणे विरोध केला होता. समांतर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फतच पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळविले होते. जर तेव्हाच नागरिकांचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेतला असता तर आज पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालीच नसती असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.