Aurangabad : रिक्षाचालकांना शिस्त लागेपर्यंत कारवाई करा; विभागीय आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad rickshaw driver

Aurangabad : रिक्षाचालकांना शिस्त लागेपर्यंत कारवाई करा; विभागीय आयुक्त

औरंगाबाद : शहरातील रिक्षाचालकांच्या बेशिस्तीबद्दल विभागीय आयुक्तांनी दखल घेत रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने तातडीने रिक्षा संघटनांची बैठक घेत रिक्षाचालकांनी नियम आणि शिस्त पाळण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरटीओ कार्यालयाने आता पोलिसांच्या मदतीने बेशिस्त रिक्षाचालकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे.

रिक्षाचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी १४ नोव्हेंबरपासून शहरात रिक्षा चालकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. प्रादेशिक प्राधिकरण समितीने रिक्षाचालकांना नुकतीच भाडेवाढ दिलेली आहे. नवीन भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांनी मीटरचे अद्ययावतीकरण (कॅलीब्रेशन) करून घेणे अपेक्षित आहे.

मात्र याबद्दल रिक्षाचालकांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता. १८) आरटीओ कार्यालयात आढावा बैठक घेतली. आरटीओच्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरात रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लावा, त्यासाठी आवश्यक ती पोलिसांचीही मदत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजये मैत्रेवार यांनी दुपारी रिक्षा संघटनांची तातडीची बैठक घेत विभागीय आयुक्तांच्या सूचनांची माहिती दिली व कारवाई अधिक तीव्र केल्याचे स्पष्ट केले. यावेळी ३० नोव्हेंबरपर्यंत मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्यात यावे अशा सूचना दिल्या तर रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केली ती अमान्य करण्यात आली. उलट सुटीच्या दिवशीही फिटनेस करून देण्याची तयारी आरटीओ कार्यालयाने दर्शवली आहे.

शहरासह वाळूजमध्येही जप्ती मोहीम

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनीही तातडीने पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर आता आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू झाली आहे. शहरात आज पोलिस आणि आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त कारवाईत २१ रिक्षा जप्त करुन, आरटीओ कार्यालयात लावण्यात आल्या, तर दुपारनंतर वाळूज भागात ४० रिक्षा जप्त करुन वाळूज पोलिस ठाण्यात लावल्या आहेत.

याशिवाय सिडको वाहतूक शाखेनेही सिडको चौकात रिक्षाविरोधात मोहीम राबवली. आरटीओ आणि पोलिस यांनी संयुक्त मोहीम सुरु केल्यानंतर वाळूज भागात दुपारनंतर रस्त्यावरील रिक्षा गायब झाल्या. रिक्षाचालकांनी फोनाफोनी करुन सहकाऱ्यांना मोहिमेची माहिती दिल्यामुळे वाळूजच्या सर्वच परिसरातील रिक्षा रस्त्यावरुन गायब झाल्या होत्या. तरीही या मोहिमेत ४० रिक्षा वाळूज औद्योगिक परिसर आणि भागातून जप्त केल्या आहेत.

रिक्षाचालकांनी शिस्त पाळणे अपेक्षित आहे, त्यामुळे शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरुच राहणार आहे. यासाठी दोन पथकांमार्फत २४ तास तपासणी सुरु ठेवली जाणार आहे. रिक्षाचालकांनी तातडीने मीटरचे अद्ययावतीकरण (कॅलिब्रेशन) करुन घेणे आवश्यक आहे.

- संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी