esakal | पैठण तालुक्यात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; दोन लाखांचे रसायन नष्ट

बोलून बातमी शोधा

पैठण तालुक्यात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; दोन लाखांचे रसायन नष्ट
पैठण तालुक्यात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; दोन लाखांचे रसायन नष्ट
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : अनेक दिवसांपासून खंडाळा (ता.पैठण) शिवारात गावठी हातभट्टी निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी छापा मारून तीन हजार लिटर रसायन व दोनशे लिटर गावठी दारू नष्ट करून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना गजाआड केल्याने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. अधिक माहिती अशी, खंडाळा शिवारात अनेक दिवसांपासुन काहीजण स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या हातभट्टीची दारू निर्मिती करुन सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याची माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, गणेश सुरवसे, भगवान धांडे, हनुमान धनवे,जीवन गुढेकर, फेरोज बर्डे, संदीप पाटेकर, गोरखनाथ कणसे, आप्पासाहेब माळी आदींना सोबत घेऊन काही अंतरावर थांबुन पाच सरकारी पंचाना बोलवून त्यांना कारवाई संबंधीची माहीती दिली. त्यानंतर श्री.सुरवसे यांनी सहकाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी 'सर्च ऑपरेशन' केले. दरम्यान पोलिसांना पाहताच एकजण पळून गेला, तर सुभाष देवराव गायकवाड (वय ३०, रा.विहामांडवा, विष्णू रामकीसन ढगे (वय ३६, रा. वरखेड, जि.परभणी), बबन छगन मिसाळ ( वय 3८, रा.पीरबाजार, औरंगाबाद), दीपक राजाराम तुपे (३६), सुरेश माणिक फुलारे (३६, दोघे रा.राजनगर, औरंगाबाद) या पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण संदीप छबुराव डुकळे व कल्याण देवराव गायकवाड (दोघे रा.विहामांडवा, ता.पैठण) यांच्या सांगण्यावरून हातभट्टी दारूची निर्मिती करीत असल्याचे सांगुन पळुन गेलेल्याचे नाव गणेश छबुराव डूकळे (रा. विहामांडवा) असल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व परिसराची पाहणी केली असता ड्रममध्ये २०० लिटर गावठी दारू, अन्य ड्रममध्ये सडवलेला गुळ व तीन हजार लिटर अन्य रसायन सापडून आले. एकूण दोन लाख ८७ हजाराचे साहित्य पोलिसांनी जप्त करून ३२०० लिटर रसायन व गावठी दारू सर्वांसमक्ष जमिनीवर सांडून नष्ट करण्यात आले.

हा दारू अड्डा अनेक वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरू होता. हे सर्व जण गावठी निर्मिती करून गावोगावी चढ्या भावाने देऊन वरकमाई करून घेत असे. मात्र नुकतेच येथे बदलुन आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सुरवसे यांनी अवैध व गावठी दारू विक्रेत्याविरुद्ध कारवाईचा बडगा हाती घेतल्याने दारु विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे. पोलिस नाईक आप्पासाहेब माळी यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे याच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.