Aurangabad : पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers crop insurance

Aurangabad : पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. कुठल्याही परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा मोबदला विमा कंपनीला द्यावा लागतो. मात्र, गत आठ दिवसांपूर्वी चालू असलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले पीक संपूर्ण पाण्यात गेले आहे.

अशा परिस्थितीत पीक विमा कंपनीने सरसकट पीकविमा मंजूर करणे गरजेचे आहे. परंतु ऑनलाइन तक्रार करण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची एक प्रकारे थट्टा केली जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

फुलंब्री तालुक्यात ३८ हजार ८१ शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकांचा पीकविमा उतरविला आहे. पीक विमा काढत असताना खिशात पैसे नसतानाही उसनवारी करीत शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. तालुक्यातील सुमारे १५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रात हा पीकविमा उतरविण्यात आला आहे.

मात्र, यावर्षी दिवाळीपूर्वी पावसाने संततधार सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले मका, सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेले आहे. मका पीक अनेक शेतात पाण्यात तरंगताना दिसून आल्याने मकाच्या कणसाला आता कोंब फुटू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

खरीप पीक अति पावसामुळे वाया गेले, उन्हामुळे वाळले, किडीने फस्त केले किंवा अतिवृष्टीत वाहून गेले अशा विविध कारणांमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून शासनाने पीकविमा योजना सुरू केलेली आहे. या पीकविमा योजनेत काही हिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी यांनी लाभार्थी हिस्सा भरून आपापल्या पिकांचा विमा उतरविला आहे.

नुकसानीनंतर सरसकट पीक विमा मंजूर करणे गरजेचे होते. मात्र, संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविण्यास बजावले आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली समजत नसल्याने पीक विमा भरलेले शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पीकविमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ऑनलाइन तक्रार करायची कशी?

फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अनेक संघटनांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे. पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार नोंदणी करण्याची सांगितले असल्याने अनेक भागात नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन तक्रार नोंदवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.