Aurangabad News : बळीराजाला पीक विमा मिळेना; अन्‌ अतिवृष्टी अनुदान वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

Aurangabad News : बळीराजाला पीक विमा मिळेना; अन्‌ अतिवृष्टी अनुदान वाऱ्यावर

पैठण : यंदा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून अतिवृष्टीचा फटका बसून शेतकऱ्यांचे खरीप पीक मातीमोल झाले. पिकांचे पंचनामे होऊनही अद्याप कसली मदत मिळाली नसून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अजूनही शासनाच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. असे असताना पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नाही. त्यामुळे बळिराजाने संताप व्यक्त केला आहे.

तालुक्यात यापूर्वीही अनेकदा अतिवृष्टी झाली होती. मात्र, त्यावेळीही पीक विमा कंपनीने दिरंगाईची भूमिका घेतली होती. यंदाही शेतकऱ्यांना त्याच अनुभवातून जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनीकडूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. नेहमीप्रमाणे पीक विमा कंपनी मनमानी कारभार करीत तुटपुंजी भरपाई देऊन मोकळे होते की काय, अशी ही भीती शेतकऱ्यांना आहे. यासाठी तालुक्यात आजपर्यंत कुणीही आवाज उठवीत नसल्याचे चित्र आहे.शेतीचे उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पेरणी करून दुसरे पीक येईपर्यंत आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. याचाच फायदा जणू पीक विमा कंपनी घेत आहे की काय० असा प्रश्न पीक विमाधारक शेतकऱ्यांना पडला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही याप्रश्नी लक्ष घालून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे.

पैठण तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आपल्या पिकांची काहीतरी संरक्षित रक्कम असावी या उद्देशाने विमा उतरवला. मात्र, पंचनाम्याअभावी ही योजना रखडली आहे. त्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित आहेत. शासनाने अतिवृष्टी तर विमा कंपनीने भरपाई द्यावी. नसता आंदोलन करण्यात येईल.

-माऊली मुळे, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, पैठण.