Aurangabad DCC Bank: जिल्हा बँकेचे स्टेरिंग सत्तारांच्या हातात; मात्र सेनेत फूट

aurangabad district bank
aurangabad district bank

औरंगाबाद: बहुचर्चित जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक काल (५ एप्रिल) पार पडली. बँकेच्या स्थापनेपासून कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक पहिल्यांदाच शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. बँकेचा अध्यक्ष, उपाध्यक्षही सेनेचाच झाला आहे. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली आहे. बँकेच्या निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालानंतर बँकेचे समीकरणच बदलून गेले आहे. शिवसेनेचे संख्याबळ वाढवत दोन्ही पदांवर आपल्या मर्जीतील व्यक्तींना विराजमान करण्यात राज्यमंत्र्यांना यश आले आहे. या माध्यमातून जिल्हा बँकेचे स्टेअरिंग पूर्णपणे आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हातात आले आहे. 

ही परंपरा २०१९ पर्यंत चालत राहिली. बँकेत कॉंग्रेसचे संचालक जास्त असल्यामुळे अध्यक्ष कॉंग्रेसचाच होता. मात्र यावेळी निवडणूक ही वेगळ्याच पध्दतीने झाली. वैयक्तिकरित्या ज्यांनी मतदारांना ‘खुश’ केले, ते निवडून आले. यामुळे बँकेचे विद्यमान तब्बल सहा संचालकांचा पराभव झाला. यात गेल्या २५ वर्षांपासून सहकार क्षेत्र यशस्वी सांभाळणारे आमदार हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला होता. 

या निवडणुकीत अभिजीत देशमुख, अंकुश रंधे, रंगनाथ काळे, नंदकुमार गांधीले, अशोक मगर या सहा दिग्गजांचा पराभव झाला. यात तितकेच नवीन संचालकांनी बँकेत प्रवेश केला. दिवगंत सुरेश पाटील आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा व्यवहार सुरु होता. मात्र, सुरेश पाटील आता नाहीत. त्यानंतर आमदार बागडे यांच्या पराभवामुळे आता बँकेत कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हेच अनुभवी संचालक आहेत. दरम्यानच्या काळात निवडणुकीत अध्यक्षपद मिळावे, यासाठी भाजपला रामराम करीत बँकेचे नूतन अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांच्यासह शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले कृष्णा पाटील डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांना पुन्हा शिवसेनेत आणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘मातोश्री’वर आपले वजन वाढवले. याचाच फायदा घेत आजच्या निवडणुकीत अध्यक्षांबरोबर उपाध्यक्ष आपल्याच मर्जीतील बनविले आहे. याच निवडीवरून शिवसेनेचे दोन गट पडले. कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांनी गाढेंऐवजी कृष्णा पाटील डोणगावकर यांना उपाध्यक्ष करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, त्यांचा पराभव झाला. आगामी काळात संचालक मंडळात निर्णय घेताना कृष्णा डोणगावकर यांच्या बाजूने उभे राहिलेले भुमरे, दानवे यांचा सामना करावा लागणार आहे. ही नाराजी बँकेच्या पुढील कारभारात अडथळा ठरणार हे मात्र नक्की. 

२०१९ नंतर सत्तार-झांबड एकत्र 

मूळ कॉंग्रेसचे असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार सुभाष झांबड यांच्याशी उमेदवारीवरून वाद झाला होता. त्यानंतर नाराज झालेले सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर आजच्या अध्यक्ष निवडीसाठी सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे विरोधी पॅनेनला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मदत करण्याची मागणी केली. निवडणुकीपूर्वी सर्व संचालकांची बैठक झाली. या बैठकीत सुभाष झांबड आणि काळे यांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे तर जुने मतभेद विसरत एकाच वाहनातून जात उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार यांचे समर्थक अर्जुन गाढे यांना मतदान केले. यामुळे शिवसेनेत दोन गट पडले तरी झांबड-काळे यांची मदत सत्तार यांच्या गटाला मिळणार आहे.

सेनेत फूट- 
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळेस कॅ. मंत्री संदिपान भूमरे, आमदार अंबादास दानवे नाराज असल्याचे दिसले होते. त्यांनी सत्तारांनी दिलेल्या उमेदवाराविरुद्ध मतदान करत काढता पाय घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com