ऊर्जेत भारताने आत्मनिर्भर होणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Pralhada Ramarao

येत्या काळात जगावर सर्वांत मोठे संकट ऊर्जेचे असणार आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांना मर्यादा आहेत.

Dr. Pralhada Ramarao : ऊर्जेत भारताने आत्मनिर्भर होणे गरजेचे

औरंगाबाद - येत्या काळात जगावर सर्वांत मोठे संकट ऊर्जेचे असणार आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांना मर्यादा आहेत. ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेसाठी अमेरिका, रशिया, चीन या देशांकडून प्रतिसूर्याची निर्मिती करण्यावर संशोधन सुरू आहे. तसेच रशिया किंवा अरब देशांकडून तेलाचा साठा, पुरवठा बंद होऊ शकतो. भारताकडे ऊर्जेचे स्रोत पुरेसे नाहीत. म्हणून स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताला स्वतःचे ऊर्जास्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. ऊर्जा हा माझा आवडता विषय असल्याने त्यावर दहा वर्षांपासून संशोधन सुरू आहे. समुद्राच्या पाण्यातून हायड्रोजन मिळवून त्यापासून ऊर्जा निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही काळात त्यामध्ये नक्की यश मिळेल, असा विश्‍वास क्षेपणास्त्रतज्ज्ञ डॉ. प्रल्हादा रामाराव यांनी व्यक्त केला.

पद्म महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता.१५) क्षेपणास्त्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. रामाराव औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत होण्यासाठी, सुरक्षेसाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याविषयी माहिती दिली. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत कामाचे अनुभव शेअर केले. यावेळी डॉ. रामाराव म्हणाले, की मी तीस वर्षे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केले. डॉ. कलाम यांची राहणी अगदी साधी होती. ते एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर रूम घेऊन राहत होते. ते कधी येतात, कधी जातात हे कोणालाच माहीत होत नव्हते. त्यामुळे हॉटेल कर्मचारी कलाम यांचे जेवण त्यांच्या खोलीच्या दारात झाकून ठेवत असत. ते कधी अकरा, बारा कितीही वाजता रूमवर जात असत. त्यानंतर जेवण करायचे लगेच झोपायचे. परत सकाळी उठून कामावर हजर होत. कधीकधी दोन ते तीन दिवस देखील रिसर्च सेंटरमध्ये काम करताना दिसायचे. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. एखाद्या प्रकल्पात अपयश आले तर मीडियाला उत्तरे देण्यासाठी ते पुढे असत आणि तोच यशस्वी झाला तर ते आम्हाला पुढे करत होते. लीडर कसा असावा? हे मला त्यांच्याकडून शिकता आले. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने नेहमीच समस्यांवर संशोधन करत राहावे आणि मिळालेले यश आपल्या सहकाऱ्यांना द्यावे, असे कलाम म्हणायचे.

अन् महिलांची केली बोलती बंद

एकदा आमच्या लॅबमध्ये संरक्षणमंत्री आले होते. त्यावेळी सर्वांना कुटुंबासह डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आमच्या प्रत्येकाच्या घरात नेहमी महिला वाद घालायच्या की, शनिवार असो रविवार, दिवस असो की रात्र नेहमी काम करत राहतात, कुटुंबाला वेळ देत नाहीत. बायकोच्या वाढदिवसालादेखील आम्ही हजर राहत नव्हतो. त्या कार्यक्रमात आमच्या तीनही प्रोजेक्ट डायरेक्टरच्या बायकांनी कलाम यांना विचारणा करायचे ठरवले की, तुम्हाला बायको, मुलं नसल्याने तुम्ही दिवसरात्र काम करतात. पण तुम्ही आमच्या नवऱ्यांना का दिवसरात्र कामात गुंतवून ठेवता? आमचं बोलणं सुरू असताना तेवढ्यात तेथे कलाम आले.

या महिलांनी कलाम यांना विचारले की, तुम्ही का दिवसरात्र आमच्या नवऱ्यांना कामात गुंतवून ठेवतात? कलाम यांची बोलण्याची पद्धत एकदम साधी होती. ते म्हणाले, मी तर सतत त्यांना सुटी घ्या, कुटुंबाला वेळ द्या, असे म्हणतो. पण तुमचे नवरे कधीच सुटी घेत नाहीत. त्यांनी देखील स्वतःला देशसेवेसाठी समर्पित केले आहे. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की, तुम्हाला त्यांच्यासारखे पती मिळाले! कलाम यांनी आमची अशी स्तुती केल्याने महिलांची बोलतीच बंद झाली! अशी आठवणही डॉ. रामाराव यांनी सांगितली.

असे दिले क्षेपणास्त्राला ‘ब्राम्होस’ नाव

डॉ. कलाम हे प्रोग्राम डायरेक्टर होते, त्यांच्या मार्गदर्शनाखील मी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत आणि रशिया दोन्ही देशांनी एकत्र येत ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्र बनवले. त्यासाठी ब्रम्हपुत्रा आणि रशियामधील मॉस्कोव्हा या नद्यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. हे जगातील सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्र केवळ भारताकडे आहे. पूर्वी भारत संरक्षणासाठी लागणारे शस्त्र आयात करत होता. आता क्षेपणास्त्राबाबत भारत आत्मनिर्भर झाला आहे. अनेक देश भारताकडे या क्षेपणास्त्राची मागणी करत असून त्याची निर्यातीबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :IndiaaurangabadEnergy