औरंगाबाद : शिंदे गटात या, कामे देऊ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

औरंगाबाद : शिंदे गटात या, कामे देऊ!

औरंगाबाद - शिवसेना फुटीनंतर एकीकडे शिंदे गटातील आमदार शक्तिप्रदर्शन करीत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी मेळावे घेत फूट रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाच्या गळाला अद्याप शहरातील प्रमुख पदाधिकारी लागले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुम्हाला कामे मिळतील, आमच्याकडे या, असे फोन काही पदाधिकाऱ्यांना केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यातील अब्दुल सत्तार वगळता चार आमदार मतदारसंघात परत आले आहेत. शहरात आमदार प्रदीप जैस्वाल व संजय शिरसाट यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी श्री. जैस्वाल यांच्या स्वागतप्रसंगी शिवसेनेतील पदाधिकारी फिरकले नाहीत. त्यावर पुढील आठ दिवसांत काय चमत्कार होतो ते पहा, असा सूचक इशारा जैस्वाल यांनी दिला होता तर शिरसाट यांनी शिवसेनेतील पदाधिकारी समोर येत नसले तरी अनेकांनी फोनवर संपर्क साधला असल्याचा दावा केला होता. दरम्यान शिवसेनेतर्फे शिंदे गटातील आमदारांसोबत पक्षातील कोणीही नसल्याचा दावा केला जात आहे.

असे असतानाच आता काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना मध्यस्थी व्यक्ती फोन करत असून, आगामी काळात शिंदे गटातील आमदारांना कोट्यवधींची कामे मिळणार आहेत. ही कामे तुम्हाला दिले जातील, इकडे या, असे आमिष दाखविले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात सध्या आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत; पण ही कामे ठराविक व मर्जीतील पदाधिकाऱ्यांनाच दिली जातात.

विशेष म्हणजे हेच पदाधिकारी शिंदे गटातील आमदारांसोबत दिसले होते. ज्यांना फोन आले ते पदाधिकारी मात्र एवढे दिवस आमच्या सारख्यांची आमदारांना आठवण झाली नाही, आता बंडखोरीनंतर कामे मिळतीलच, याचा काय भरवसा असा प्रश्‍न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Aurangabad Eknath Shinde Rebel Mla Call To Shiv Sena Office Bearers Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top