Sillod: आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

सिल्लोड : आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड : जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ पूर्ण होत असताना आता तालुक्यात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांचे पडघम वाजण्याआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा विकासकामांच्या उद्घाटनावर भर असून दुसरीकडे भाजपकडून बूथ अभियानातून कार्यकर्त्यांच्‍या भेटीगाठी घेण्याचा सपाटा सुरु झाला आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदचे आठ गट तर पंचायत समितीचे सोळा गण आहेत. मागील निवडणुकीचा विचार करता पूर्वाश्रमी कॉंग्रेसच्या हातावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या चार गटात तर पंचायत समितीच्या सात गणामध्ये सदस्य निवडून आणले होते. तर भाजपने जिल्हा परिषदेच्या चार गटात तसेच पंचायत समितीच्या नऊ गणामध्ये वर्चस्व मिळवीत पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेतली होती.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

तालुक्यात मंत्री सत्तार यांनी शिवसेनेचे जाळे निर्माण केले असून, शिवसेना व भाजप असा सत्ता संघर्षाचा सामना बघावयास मिळणार आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास तालुक्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य नसल्याने शिवसेना स्वबळावरच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी तालुक्यात भेटीगाठी सुरू केल्या आहे.

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवना, घाटनांद्रा, अजिंठा, भवन गटांमध्ये विशेष लक्ष देत विविध विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. तर इतरही चार गटांमध्ये विकासकामांसह कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत.

भराडी गटातून कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन अद्यापही कॉंग्रेसवासीच असून, त्यांच्यातील व सत्तारांमधील संबंध बिघडल्यामुळे दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या शेवटी होणार असल्याची चर्चा होत असताना राजकीय आरक्षणाकडे देखील सर्वांच्या नजरा असणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव बघता निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर मात्र, तालुक्यात राजकीय घौडदौड मोठ्या प्रमाणात बघावयास मिळणार आहे. गत अडीच वर्षापूर्वी सत्तार यांनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीच्यावेळी भाजपच्या सत्तेला सुरुंग लावून आमठाणा गणातील डॉ.कल्पना जामकर व भराडी गणातील काकासाहेब राकडे या भाजपच्या सदस्यांना गळाला लावत पंचायत समितीवर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकविला.

जामकर यांना सभापती तर राकडे यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली होती. भाजपच्या जिव्हारी लागलेल्या या सत्तासंघर्षानंतर तालुक्यात भाजपची बसलेली घडी विस्कळित झाली. परंतु भाजपच्या नेत्यांनी देखील आता गावपातळीवर संघटनांची मोट बांधण्यास सुरूवात केली असून, आमठाणा व भराडी गणात विजय खेचून आणण्याची आखणी देखिल त्यांना करावी लागणार आहे.

दानवे, सत्तार यांच्या मैत्रीत आता कार्यकर्त्यांची कैची

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. दोघांनीही एकमेकांवर आगपखाड केल्यानंतर आता पुन्हा जिल्हा परिषद इमारत बांधकाम शुभारंभाच्यावेळी दोघांची जवळीक पुन्हा वाढली आहे. राजकारणाच्यापलीकडे मैत्रीचे संबंध असतात याची वाच्यता दोघांकडून होऊ लागली आहे. डिनर डिप्लोमसीनंतर दोघांमधील मैत्रीच्या बातम्या सातत्याने येत असताना आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे कैची होणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

loading image
go to top