
औरंगाबाद : भागीदाराला फसवून ७६ लाखांचा अपहार
वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीत भागीदारीमध्ये सुरू असलेल्या कंपनीच्या एका भागीदाराने दोघा भागीदाराचा विश्वासघात करून ७६ लाख ५६ हजार ७६२ रुपयाचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध मंगळवारी रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिडको, औरंगाबाद येथील विनय नवीनचंद जैन, सुरेंद्र राजपूत व सागर राजपूत या तिघांनी भागीदारीत पंढरपूर येथे सॅफायर प्लॉस्टोकेम प्रा.लि.या नावाची कंपनी स्थापन केली होती. यात विनय जैन व सुरेंद्र राजपूत यांचा प्रत्येकी ४० टक्के तर सागर राजपूत २० टक्के भागीदार आहेत. या कंपनीची आरओसी कार्यालयात २०१४ मध्ये नोंदणी करण्यात आली असून रिलायन्स कंपनीकडून प्लॅस्टिक दाणा हे मटेरियल्स खरेदी करून इतर कंपन्यांना पुरविला जातो. विनय जैन यांचे इतर व्यवसाय असल्यामुळे विनय जैन व सागर राजपूत यांनी सुरेंद्र राजपूत यांना कंपनीचे सर्व कामकाज पाहण्याचा व वर्षाला हिशोब देण्याचे अधिकार दिले होते.
या अधिकारानंतर सुरेंद्र राजपूत यांनी २०१५ ते २०१७ या दोन वर्षाचा हिशोब विनय व सागर या भागीदारांना दिला. त्यांनी तो कंपनीचा नफा कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सुरेंद्र राजपूत यांनी कंपनीचा हिशोब देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या दोन भागीदारांनी हिशोबासाठी सुरेंद्र राजपूत यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला. सुरेंद्र राजपूत हे हिशोब देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना संचालकपदावरून काढून टाकण्याची नोटीस बजावली होती.
या नोटीसमुळे सुरेंद्र राजपूत याने संचालक पदावरून काढू नका, अशी विनंती केली होती. १८ जून रोजी विनय जैन व प्रफुल्ल राठी यांनी कंपनीच्या गोदामात जाऊन पाहणी केली असता त्यांना १० ते ११ टन प्लॅस्टिक दाणा गायब असल्याचे दिसले. यानंतर जैन यांनी स्टोअर इन्चार्ज राजू भालकर व हेल्पर उमेश आंधळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गायब माल सुरेंद्र राजपूत यांच्या हिरा पॉलीप्रिंट या कंपनीत ठेवण्यात आल्याचे सांगितले.
प्रकारानंतर सुरेंद्र राजपूत याच्यावर संशय बळावल्याने जैन यांनी कंपनीच्या आरओसी ॲपची पाहणी केली असता कंपनीतील काही माहिती डाऊनलोड केल्याचे समजले. त्यात सुरेंद्र राजपूत याने मागील तारखेत कंपनीची बोर्ड मीटिंग झाल्याचे भासवून तशी कागदपत्रे तयार केली. यानंतर राजपूत याने स्वत:च्या नावावरील १०० शेअर्स पत्नी रेणू राजपूत व आई भिकाबाई राजपूत यांच्या नावावर ट्रॉन्स्फर करून त्यांना कंपनीचे संचालकही केले. तसेच राजपूत याने शेअर्स होल्डरची मीटिंग झाल्याचे दाखवून स्वत:चे २ लाख रुपये कंपनीच्या खात्यावर जमा करून स्वत:चे शेअर्स वाढवून घेतले.
भागीदार विनय जैन व सागर राजपूत या दोघांचा विश्वासघात करून वर्ष २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत कंपनीला झालेल्या एकूण २ कोटी १६ लाख ४८ हजार ३५२ रुपयांपैकी ७६ लाख ५६ हजार ७६२ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी विनय जैन यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेंद्र राजपूत, रेणू राजपूत व भिकाबाई राजपूत या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहे.
Web Title: Aurangabad Fraud Crime News Partner Cheating 76 Lakhs Waluj Industrial Estate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..