Aurangabad Gram Panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांची फौज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Gram Panchayat

Aurangabad Gram Panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांची फौज

पैठण : राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. त्यातच आता निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात पैठण तालुक्यातील २२ गावांमध्ये निवडणुकीला रंग चढू लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत दिवसेंदिवस तरुणांचा कल वाढत असून ज्येष्ठांना यंदा निवडणुकीत तरुणांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत युवक वर्गाचा मोठा कल दिसून येत आहे. गावावर राजकीय वर्चस्व कोणाचे याची गावस्तरावर युवकांची चाचपणी सुरू आहे. येत्या १८ डिसेंबरला तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक गावची असली तरी कसोटी तालुकास्तरीय नेत्यांची राहत असल्याने मोठ्या नेत्यांचेही लक्ष या निवडणुकांकडे आहे.

विशेष म्हणजे, अनेक गावांत एकाच राजकीय पक्षातील विविध गट आकाराला येत असल्याचे दिसत असून या गटांना सांभाळताना गटांच्या परस्परविरोधी आघाड्यांना सांभाळताना तालुकास्तरावरील नेत्यांना कसरत करावी लागत आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने जबाबदारी असून कोणता उमेदवार सरस ठरू शकतो याचा मागोवा घेतला जात आहे. या निवडणुकीत उच्च शिक्षित तरुण, तरुणी आपले नशीब अजमावण्यास इच्छुक असून येणाऱ्या निवडणुकीत जनता कुणाला पसंती देते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

बड्या नेत्यांचे लक्ष!

-ग्रामपंचायतीची निवडणूक ही गाव पातळीवरील असली तरी प्रमुख राजकीय पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. गाव पातळीवरून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे समीकरण तयार होत असल्याने बहुतांश गावात आपल्याच पक्षाचा सरपंच राहावा या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे आता बड्या नेत्यांचेही लक्ष लागल्याचे चित्र पैठण मतदार संघात आहे.

ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार आहे. यासाठी गावातील युवा वर्ग सुद्धा सक्रिय झाला आहे. नवी पिढी नवा रुबाब, विकासाची संकल्पना या उद्देशाने तरुण या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे.

- विलास भुमरे, युवा नेते, बाळासाहेबांची शिवसेना, पैठण.