औरंगाबाद : कन्नड नगरपरिषदेची निवडणूक ठरणार प्रतिष्ठेची

आमदार राजपूत यांच्या कामगिरीकडे लक्ष : भाजपला ओळखीची, राष्ट्रवादीची सत्ता राखण्याची, शिंदे गटाला पारखण्याची लढाई
Aurangabad Kannad municipal council election
Aurangabad Kannad municipal council election

कन्नड - कन्नड नगरपरिषदेच्या लांबलेल्या निवडणुकीमुळे आणि सतत बदलणाऱ्या राजकीय समीकरणामुळे नित्य नवे पेच उभे राहात आहेत. आता न्यायालयाच्या निर्देशानुसार २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला आहे. राज्यात शिवसेनेत बंडाची रणधुमाळी सुरू असताना कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील नगरपरिषदेच्या निवडणूक आमदारांच्या प्रतिष्ठेची, भाजपला नवी ओळख मिळवून देण्याची, राष्ट्रवादीला सत्ता राखण्याची, शिंदे गटाला स्वतः ला पारखण्याची ठरणार आहे.

कन्नड नगरपरिषदेच्या बारा प्रभागासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पद जनतेतून निवडून येणार असल्याने इच्छुकांनी कंबर कसली आहे. शिवसेना बंडखोरांना प्रति आव्हानच नव्हे तर प्रतिवाद करून आमदार उदयसिंग राजपूत यांनी सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोर शिवसेना आमदारांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. त्याची प्रचिती नावडी येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला.

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी कन्नड तालुक्यात उपस्थिती लाऊन व्यक्तीगत आर्थिक मदतही दिली. शिवसेनेची मदार आमदार राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे व कट्टर शिवसैनिकांवर आहे. कन्नड शहरात चाळीस टक्के मुस्लिम मतदार आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रभाव या मतदारांवर आहे. त्यांचे कट्टर समर्थक जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनाही गमावलेले आपले राजकीय अस्तित्व या निवडणुकीतून मिळवायचे आहे. आमदार सत्तार यांच्यासोबत माजी आमदार नितीन पाटील सुद्धा बंडखोर शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत.

कन्नड शहरात विधानसभा निवडणुकीत आमदार राजपूत यांनी मोठे मताधिक्य मिळवले आहे. सध्या धनुष्यबाण चिन्हं कुणाला मिळते यावरही बरेच गणिते अवलंबून आहेत. भाजपनेही आपली ताकद वाढवली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, संजय खंबायते, संजना जाधव, डॉ.संजय गव्हाणे, काकासाहेब तायडे यांनी नगरपरिषदेत कमळ फुलविण्याचा संकल्प केला आहे. मात्र बंडखोर शिंदे गट आणि भाजप यांच्यात समन्वय राखावा लागणार आहे.

कॉँग्रेस पक्षाची गेली तीन पंचवार्षिक नगरपरिषदेवर सत्ता राहिली. मात्र, संतोष कोल्हे, माजी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे आपल्या समर्थक नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले. सतत पंधरा वर्षे सत्तेत असल्याने जनतेच्या मनात पुन्हा कोल्हे परिवाराला सत्तेत बसवायचे की बाजूला बसवायचे याबाबत काय शिजते आहे. तालुक्यात कॉंग्रेसला मानणाराही मोठा वर्ग आहे. माजी आमदार नामदेवराव पवार, डॉ.कल्याण काळे हे कॉँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी कशी बांधतात यावर कॉँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.

तसेच एमआयएम पक्षाने जर जनाधार असलेला उमेदवार दिला तर अधिक चुरस वाढणार आहे. कन्नड नगरपरिषद ओबीसी बहुल मतदारांची आहे. दलित, मुस्लिम मते जर धर्मनिरपेक्ष कॉँग्रेस पक्षासोबत राहिली तर अनपेक्षित निकाल समोर येऊ शकतो. नगरपरिषद निवडणूक तोंडावर आली असून इच्छुकांनी खासगी संस्थेद्वारे मतदारांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मतदारांत सहानुभूती दिसून येत आहे. मात्र, धनुष्यबाण चिन्हं कोणाकडे राहील यावरही मतदारांत संभ्रम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com