Aurangabad : पाऊस लांबल्याने पिके धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kharif crop damage farmer agriculture loss

Aurangabad : पाऊस लांबल्याने पिके धोक्यात

दुधड : औरंगाबाद तालुक्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात ९० टक्के पेरणी झाली असून सध्या कपाशीचे पीक फुलोऱ्यात आले आहे. तर सोयाबीनला देखील शेंगा लगडल्या असून दाणे भरण्याचा काळ आहे. परंतु मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे सुमारे येथील ६५ हजार ८५५ हेक्टरवरील पिके सुकू लागली असून यामुळे बळिराजाच्या चिंता वाढली आहे.

तालुक्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मका, मुग, उडीद, तीळ यासह इत्यादी पिकांची ६५ हजार ८५५ हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी झाली आहे. उशिराने पेरणी झाल्यामुळे मुग, उडीद, तीळ, मका, बाजरी या पिकांची अत्यल्प प्रमाणात पेरणी झालेली असून प्रथम क्रमांकावर कापूस तर दुसऱ्या स्थानी तूर , तिसऱ्या स्थानी सोयाबिन पेरणी झालेली आहे. सोयाबीन, तूर, कपाशीला मिळालेला जास्तीचा भावामुळे शेतकऱ्यांनी यंदा जास्त पेरणी केली.

हंगामाच्या सुरुवातीपासूनच रिमझीम पाऊस होत असून अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. रिमझीम पावसावरच पिके बहरलेली आहेत. परंतु मागील वीस दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे कपाशी आणि सोयाबीन पिकाचे भविष्य धोक्यात आले आहे. कपाशीला बोंडे लागत आहेत तर सोयाबीनला शेंगा लगडल्या आहेत. या महत्त्वाच्या काळात पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी राजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामात कापसाची ३९ हजार ८१८ तर सोयाबिन ५ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

पाऊस लांबल्याने पिकांना ताण सहन करण्यासाठी १३:००:४५ या विद्राव्य खताचे १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. हलकी अंतर मशागत करावी. जेणेकरून जमिनीतून केस आकर्षणद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होईल.

-हर्षदा जगताप (तालुका कृषी अधिकारी):

यंदाच्या खरिपात उशिराने पेरणी झाली. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. रिपरिप पावसामुळे पिके चांगली होती. परंतु वीस दिवसांपासून गायब झालेल्या पावसामुळे पिके सुकू लागली.

-शिवाजी वाघ (शेतकरी शेकटा)