esakal | औरंगाबादेत कोरोना लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्प

बोलून बातमी शोधा

कोविशिल्ड लस
औरंगाबादेत कोरोना लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्प
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लसीकरण वाढविण्याच्या सूचना दिल्या जात असताना दुसरीकडे लसींचा साठा संपल्याने मोहीम थांबविण्याची नामुष्की महापालिकेवर मंगळवारी (ता. २०) ओढवली. अनेक केंद्रांवर दुपारनंतर लसींचा साठा संपला. त्यामुळे प्रशासनाने मोहीम अर्धवट गुंडाळली. दरम्यान लस आणण्यासाठी महापालिकेने पाठविलेले वाहन मुंबईहून आज शहरात येईल, असे सांगितले जात असले तरी लस न मिळाल्यास बुधवारी (ता. २१) लसीकरण मोहीम बंद पडण्याची शक्यता आहे.

लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून महापालिकेने आतापर्यंत एक लाख ७५ हजार ८९२ नागरिकांना लस दिली आहे. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर महापालिकेने प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे ११३ केंद्रे सुरू केली. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस दिली जात आहे. पण लसीचा शासनाकडून मुबलक साठा मिळत नसल्याने ही मोहीम वारंवार संकटात येत आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने तब्बल एक लाख लसीची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात चाळीस हजार डोस देण्यात आले.

हे डोस संपत आल्याने प्रशासनातर्फे लसींसाठी पाठपुरावा सुरू आहे. सोमवारी लसीकरण झाल्यानंतर मंगळवारी (ता. २०) पुरतील एवढाच साठा शिल्लक होता. त्यामुळे महापालिकेचे वाहन लस आणण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. पण हे वाहन लस घेऊन शहरात आलेले नाही. लस शहरात आली तर आज बुधवारी मोहीम पूर्ववत सुरू होईल. अन्यथा लसीकरण थांबणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

लसीचे डोस मिळावेत यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. बुधवारी पहाटेपर्यंत लस शहरात निश्चित येईल. मंगळवारी लसीचा साठा संपल्याने काही केंद्रांवर अर्धवट मोहीम राबवावी लागली.

- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.