esakal | 'गंभीर रुग्णांना प्राधान्याने रेमडेसिवीर द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

'गंभीर रुग्णांना प्राधान्याने रेमडेसिवीर द्या'

'गंभीर रुग्णांना प्राधान्याने रेमडेसिवीर द्या'

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचे पालन करुन रुग्णांची वर्गवारी करत उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. आपल्या जिल्ह्यात रेमडेसिवीरची उपलब्धता असली तरी त्याचा काटेकोरपणे वापर करावा लागणार आहे. अन्यथा इतर जिल्ह्यांमध्ये रेमडीसिवीरसाठी रूग्णांचे नातेवाईक फिरताना दिसतात तसे चित्र दिसायला वेळ लागणार नाही, अशी भिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी रेमडेसिवीरबाबत बोलताना सांगितले की, रेमडेसिवीरची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न व औषधी प्रशासन, महापालिकेकडे केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयाची ८६५ इंजेक्शनची उपलब्धता आहे. तर वापर १४०० इतकी आहे. खासगी रुग्णालयाची उपलब्धता आणि वापर याचे गुणोत्तर बिघडत चालले आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा मुक्त हस्त वापर सुरू आहे. यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करून रुग्णांची वर्गवारी करून रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करावा असे आवाहन खासगीत रुग्णालयांना केले. महापालिका, घाटी, सिव्हिल हॉस्पिटल यांना दररोज साडेसातशे ते आठशे इंजेक्शनची रोज गरज आहे. आपल्याकडे उपलब्ध आहेत मात्र त्यांचा जपून वापर करणे गरजेचे बनले आहे.

ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसीवीरची आवश्यकता आहे. त्यांनी त्यासाठी रुग्णनिहाय आपली मागणी सविस्तर अर्जाद्वारे जिल्हाधिकारी मदत कक्षात सायंकाळी ६ वाजेपर्यंत (०२४०-२३३१२००), तसेच अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक श्री. बजाज ९४२२४९६९४१ या क्रमांकावर व्हॉटस् ॲपद्वारे करावी. संबंधित प्राप्त अर्जांची अन्न औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करून त्यानंतर घाटीच्या औषध विभागात पात्र अर्ज संदर्भित केल्या जातील. त्यातील रुग्णांच्या गरजेनुसार रुग्णालयास डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्यामार्फत रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिकरीत्या रुग्णांच्या नातेवाइकांनी मदत कक्षात इंजेक्शनची मागणी करु नये. खासगी रुग्णालयामार्फतच इंजेक्शन मागणी केल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.