esakal | एक हजार शिक्षक बदलीच्या प्रतिक्षेत, कोरोनामुळे प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता

बोलून बातमी शोधा

एक हजार शिक्षक बदलीच्या प्रतिक्षेत, कोरोनामुळे प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता
एक हजार शिक्षक बदलीच्या प्रतिक्षेत, कोरोनामुळे प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता
sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : मागील वर्षी विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ग्रामविकास विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. बदली प्रक्रिया पूर्ण करण्यास शासनाने ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी, तसेच जिल्हा परिषदेकडून संथ गतीने सुरु असलेल्या प्रक्रियेमुळे यंदा देखील बदली प्रक्रिया रखडणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या सुमारे १२ हजार शिक्षकांचा विचार करता सुमारे एक हजाराहून अधिक शिक्षकांच्या बदल्या यंदा होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदा ३१ मे पुर्वी बदल्या कराव्यात असे शासननिर्देशात निर्धारित केले आहे. यात अवघड क्षेत्रातील शाळा जाहीर करणे, बदली प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण, बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, शाळानिहाय रिक्त जागा घोषीत करणे, समानीकरणातंर्गत कायम रिक्त जागा घोषित करणे, या सर्व प्रक्रियेनंतर टप्पा १ ते ४ मध्ये एका नंतर एका संवर्गनिहाय बदल्या करणे एवढी दीर्घ प्रक्रीया पार पाडण्यात येते. ही संपुर्ण बदली प्रकिया पार पाडण्यासाठी सर्वच जिल्हा परिषदांना साधारणतः ४० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु अद्याप प्रशासनाकडून कुठलीच हालचाल होताना दिसत नाही. त्यात कोरोनाचा वाढलेला संसर्गामुळे बदल्याचे गणित बिघडले आहे. त्यामुळे यावर्षी बदल्या होतील की नाही याबद्दलच साशंकता आहे.

या बदली धोरणाने गेल्या दोन वर्षात सगळी शिक्षण व्यवस्थाच विस्कळीत करून टाकली आहे. मुलांमध्य रूळलेले शिक्षक एकाएकी वावटळीने उडून जावेत तसे रानोमाळ विखुरले. शिक्षकांच्या समानीकरणाच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात हजारो रिक्त पदे ठेवून शासनाने शिक्षण क्षेत्राचे मातेरे केले आहे.

- राजेश हिवाळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

जिल्हा प्रशासनाने अद्याप अवघड शाळा घोषित केलेल्या नाहीत. एक ते चार संवर्गातील शिक्षकांची माहिती घेणे बाकी आहे. शिक्षकांना फॉर्म भरायला वेळ लागणार आहे. या प्रक्रियेसाठी किमान ४० ते ५० दिवसांचा कालावधी लागतो. कोरोनामुळे या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने यंदा बदल्या होणे अशक्य वाटत आहे.

- रणजित राठोड, जिल्हा सरचिटणीस, शिक्षक समिती