Aurangabad Lockdown: जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व दुकाने आजपासून बंद

Aurangabad lockdown
Aurangabad lockdown

औरंगाबाद: राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे निर्बंध लावले आहे, ते जशाला तसे लागू राहतील. यात किराणा दुकाने, औषधी दुकाने, बेकरी, मिठाई, भाजीपाला, दूध, फळे या जीवनावश्‍यक बाबी वगळता सर्व बाजारपेठा मंगळवारपासून (ता.६) बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता.५) रात्री उशीरा झालेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, की शहरात दररोज पंधराशेपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्‍क्‍यांपर्यंत गेलेला आहे. तो कमी करण्यासाठी ब्रेक द चेनचे निर्बंध काटेकोरपणे पाळण्यात येतील. या अंतर्गत औषधी दुकाने, किराणा, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने सुरू राहतील. रिक्षा, बससेवा, खासगी आणि एसटी महामंडळाच्या बसेस सुरू राहतील. मात्र, त्यांना मंजूर असलेल्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के परवानगी राहील.

पावसाळा येणार असल्याने मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना मालाचा पुरवठा करणारी वाहतूक सुरू राहील. शेतीशी संबंधित सेवा सुरू राहील. प्रसिद्धी माध्यमे सुरू राहतील, रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी असेल. त्यांना मास्कसह परवानगी राहील.

सर्व शासकीय कार्यालये सुरू राहतील. मात्र, कोणत्याही अभ्यागताला त्या ठिकाणी परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. बँका, मायक्रो फायनान्स करणाऱ्या संस्था सुरू राहतील. खासगी वाहतूक सेवा आणि एसटी महामंडळाची सेवा सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहील. तसेच त्यांची तिकीट कार्यालये सुरू राहतील. प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. मास्क नसेल तर त्या प्रवाशाला आणि त्या बसच्या ऑपरेटरला दंड करण्यात येईल. प्रसार माध्यमांची कार्यालये, वर्तमानपत्राची छपाई व वितरण व्यवस्था सर्व सुरू राहील, असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी, या समारंभास येणाऱ्यांची नावे, संपर्क, पत्ता प्रशासनाला द्यावे लागेल. केटरिंगची व्यवस्था करणाऱ्यांचे लसीकरण आणि आरटीपीसीआर केल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे लागेल. चाचणी करून प्रमाणपत्र सोबत न ठेवल्यास त्या व्यक्तीस एक हजार तर त्यांच्या मालकास दहा हजाराचा दंड आकारण्यात येईल. अंत्ययात्रेला वीस लोकांनाच परवानगी असेल. त्यांचेही नाव नंबर आणि पत्ते प्रशासनाला द्यावे लागतील. 

कामगार बाधित झाल्यावर पगार कापू नये-
सर्व कारखाने सुरू राहतील. ज्या कारखान्यांमध्ये पाचशेपेक्षा जास्त कामगार असतील त्यांनी स्वतःचे आयसोलेशन सेंटर सुरू करावेत. एखादा कामगार जर पॉझिटिव्ह निघाला तर त्याचा पगार कापू नये. त्या कामगाराला आजारी रजा देण्यात यावी. ऑक्सिजन उत्पादक कंपन्या, ई-कॉमर्स सेवा सुरू राहील. ज्या ठिकाणी कामगारांना राहण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणचे बांधकाम सुरू राहील. 

खाद्य विक्रेत्यांनी द्यावी केवळ पार्सल सविधा-
रस्त्यावर खाद्य विक्री करणाऱ्यांना सकाळी सात ते रात्री आठ या वेळामध्येच फक्त पार्सल सेवा देण्याची मुभा राहील. त्यांनीही लसीकरण केल्याचे आणि आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यासह पर्यटनाच्या दृष्टीने शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये जे पर्यटक थांबलेले आहेत. त्यांच्यासाठी हॉटेलमधील इनडोर बार सुरू राहतील. इतर बार पूर्णपणे बंद राहतील, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com