औरंगाबाद : म्हाडाच्या १२०४ सदनिकांसाठी ११ हजार अर्ज | Aurangabad MHADA Project News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad MHADA Project

औरंगाबाद : म्हाडाच्या १२०४ सदनिकांसाठी ११ हजार अर्ज

औरंगाबाद : म्हाडाच्या १२०४ सदनिका, गाळे तसेच निवासी भूखंडासाठी तब्बल ११ हजार ३१२ अर्ज आले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हे ३९० सदनिका असलेल्या चिकलठाणा येथे आले आहेत. दरम्यान या सदनिकांची सोडत शुक्रवारी २४ जूनला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.(Aurangabad MHADA Project News)

दिवसेंदिवस महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) घरांना नागरिकाकडून मोठी पसंती मिळत आहे. औरंगाबाद मंडळात २६ एप्रिलला १२०२ सदनिका, गाळे तसेच निवासी भूखंडासाठी म्हाडाने सोडतीचा कार्य कार्यक्रम जाहीर केला होता. या सोडतीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

म्हाडाने अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वतीने १२०२ सदनिकांच्या विक्रीसाठी औरंगाबाद म्हाडातर्फे २६ एप्रिल ते २५ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. यानंतर पुन्हा १० जूनपर्यंत अर्जाची मुदतवाढ आली होती. यात वन बीएचके, टू बीएचके सदनिका व गाळे, निवासी भूखंडाचा सामावेश आहे. यासाठी ११ हजार ३१२ अर्ज आले आहेत. यात अल्प उत्पन्न गटासाठी चिकलठाणा येथील ३९० सदनिकांसाठी तब्बल ७ हजार ६६८ अर्ज आले आहेत. तर बन्सीलाल नगर येथील एका सदनिकांसाठी १५२ अर्ज आले आहेत. दरम्यान मराठवाड्यातील म्हाडाच्या १२०२ म्हाडा सदनिकांच्या सोडतीचा मुहूर्त २४ जूनला निश्चित करण्यात आला आहे. दुपारी १ वाजता मराठवाडा महसुल प्रबोधिनी येथे सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. गृहनिर्माण विकासमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मुंबई कार्यालयातून ऑनलाइन व्हर्च्युअल पद्धतीने घरांच्या सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

ऑलइन लिंक २३ जूनला मोबाईलवर

नोंदणी केलेल्या अर्जदारांना म्हाडाच्या कार्यालयातून २२ जूनला यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच सोडतीच्या कार्यक्रमाची ऑलइन लिंक २३ जूनला मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. याद्वारे नोंदणी केलेल्या अर्जदारांना सोडतीचा कार्यक्रम पाहता येईल. सोडत झाल्यानंतर यशस्वी झालेल्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.