Aurangabad : राजकारण वेगळे अन् मैत्री वेगळी म्हणून इथे आलो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : राजकारण वेगळे अन् मैत्री वेगळी म्हणून इथे आलो!

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे माझे चांगले मित्र आहेत. मला खासदार चषक क्रिकेट स्पर्धा आणि क्रीडा महोत्सवाला भेट देण्याची विनंती त्यांनी केली. अनेक जणांनी मला तिकडे जाऊ नका, असे सांगितले. पण महाराष्ट्रातील राजकारणाची परंपरा इतकी खालावली नाही, की मित्राने बोलावले तर दुसरा मित्र जाऊ शकणार नाही. इम्तियाज जलील हे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी म्हणून मी इथे आलो, असे सांगत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयजे क्रीडा महोत्सवाला भेट दिली.

आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडिअम उभारण्यासाठी जी काही तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे ती करून केंद्राकडून निधी मिळवून देण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देखील शिंदे यांनी यावेळी दिले. सिल्लोड येथील जाहिर सभा संपल्यानंतर खासदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या समारोप सामन्याला खासदार शिंदे यांनी हजेरी लावली. इम्तियाज जलील यांच्या गळ्यात हात घालून त्यांची आणि आपली मैत्री किती पक्की आहे, हे देखील शिंदे यांनी उपस्थितांना दाखवून दिले. दरम्यान, तरुणाईला नशेखोरीपासून दूर नेण्यासाठी आयोजित या क्रीडा महोत्सवाकडे राजकारण म्हणून पाहू नये अशी अपेक्षा व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांना या महोत्सवाचे आमंत्रण दिले होते.

योगायोग की ठरवून आणलेला योग?

शिंदे गटाचे मंत्री व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीच या महोत्सवाचे उद्धाटन केले होते. तर क्रिकेट सामन्याच्या समारोपाला शिंदे गटाचेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली हा योगायोग म्हणावा, की ठरवून आणलेला योग होता याची चर्चा आता सुरू झाली आहे. महोत्सवाला उपस्थित तरुणांची तोबा गर्दी आणि फुटबॉल स्टेडिअमची मागणी याचा उल्लेख करत शिंदे यांनी टायमिंग देखील साधले. आता या स्टेडियमसाठी त्यांची खरंच किती मदत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या क्रिकेट महोत्सवाला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील हजेरी लावली होती.