Aurangabad : केसर, मोसंबीची निर्यात क्षमता वाढवणार;फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदीपान भुमरे

Aurangabad : केसर, मोसंबीची निर्यात क्षमता वाढवणार;फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे

औरंगाबाद : केसर आंबा आणि मोसंबी फळपीकांची उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी केसर आंबा व सिट्रस पार्क उभारणीच्या आढावा बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.सात) पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, जिल्हा निबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बालासागर तौर, सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कारले आदीं प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबादचा केसर आंबा आणि जालन्याची मोसंबी या फळांना भौगोलिक मानांकन (जीआयएस ) मिळाले असल्याने या फळपीकाचे उत्पादन क्षेत्र वाढण्याबरोबरच निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाबरोबराच संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिट्रस इस्टेट पार्क उभारण्यात येत असल्याचे सांगुन पालकमंत्री श्री. भुमरे यांनी केसर आंबा क्लस्टर विकासासाठी कार्यालय, कोल्ड स्टोअरेज आणि नर्सरीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

आंबा महोत्सव घ्या

करमाड येथील पणन मंडळाच्या जागेतील कोल्ड स्टोअरेज आंब्यासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बरोबरच औरंगाबाद येथे ‘आंबा महोत्सव’ आयोजित करुन शेतकऱ्यांना या महोत्सवात जास्तीत जास्त सहभागी करुन घेण्याचे नियोजन कृषि विभागाने करावे, असे सूचित केले. मराठवाडयातील केसर आंबा इतर शहराबरोबरच परदेशात निर्यातक्षम करण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील यामध्ये सहभागी होण्यास सांगितले.

सिट्रस इस्टेट पार्क

पैठण तालुक्यात इसारवाडी येथे सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याबाबत जागेचा प्रस्ताव शासनास सादर झाला असून कृषी विभागाची मान्यता देखील काही दिवसात येईल, असे पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रोपवाटीका, अद्यावत तंत्रज्ञान, विपणन तंत्र याचे प्रशिक्षण देवून मोसंबीपासून अन्नपदार्थ तयार करण्याचे संशोधन या सिट्रस इस्टेट पार्कमध्ये करण्यात येणार आहे. मराठवाड्यात मोसंबी उत्पादन वाढविण्याच्या हेतूने शासने सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याचे निर्णय घेतल्याचा भूमरे यांनी सांगितले. आमदार श्री. बागडे यांनी शासनाच्या मालकीच्या पडीक माळरान जमिनीवर रोहयो अंतर्गत खड्डे करुन आंब्याची लागवड करण्याची सूचना केली.

रमाई आवास योजनेचा आढावा

जिल्हयात रमाई आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. चित्तेपिपंळगाव येथे मंजूर घरांच्या बांधकामास गती देण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केले. जुनी घरे नियमित करण्याबाबत तसेच ना विकास क्षेत्रातील घराबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश भूमरे यांनी दिले.