दुचाकी धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : कामावरून घरी परतताना जालना रोडवरील निसर्ग हॉटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीला भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा दहा दिवस उपचारानंतर मृत्यू झाला. हिरामण नाडे (रा. बौद्धवाडा, चिकलठाणा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी दुचाकीचालकाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरामण नाडे हे कासलीवाल अपार्टमेंट येथे साफसफाईचे काम करीत होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळी काम आटोपून ते घरी परतत होते. सकाळी १० च्या सुमारास जालना रोडवरील निसर्ग हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत असताना (एमएच २०, एफएफ ०१९९) क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते घटनास्थळी बेशुद्ध पडले. नातेवाइकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, तेथून त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील टीसीआयसीयू विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १० ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृत हिरामण नाडे यांच्या पत्नी मुक्ताबाई नाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार सुभाष पवार करीत आहेत.