
औरंगाबाद : 'सत्तर हजारासाठी' मजुराचा निर्घृण खून
दौलताबाद : करोडी (ता.औरंगाबाद) येथे गोडाऊन बांधकामासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या मजुराचा शुक्रवारी मध्यरात्री निर्दयीपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. गाठीशी जमवून ठेवलेल्या सत्तर हजारामुळेच मजुराला जीव गमवावा लागला. हत्या पैशामुळे झाली की अन्य कारणामुळे याबाबत गुन्हे शाखा व दौलताबाद पोलिसांसमोर आव्हान आहे. कैलास बियांतसिह निगवाल (वय ३४, रा. केलपानी पाडा ता. सेंधवा जि.बडवाणी, मध्यप्रदेश, ह.मु. करोडी ) असे मृत मजुराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, करोडी शिवारातील गट नंबर १११ मध्ये एका गोडाऊनचे बांधकाम सुरू आहे.
या बांधकामावर गुत्तेदारामार्फत मध्यप्रदेश मधील मजूर कैलास निगवाल हे चार भावासोबत मजुरी काम करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी आले होते. शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने मजुरी मिळाली होती. रात्री सर्व भाऊ व कुटुंबीय झोपले असताना रात्री दोनच्या सुमारास मोठा आवाज आला.त्यामुळे इतर भाऊ झोपेतून उठले असता काळ्या कपड्यातील अज्ञात इसम कैलास निगवाल याला चाकूने भोसकत असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी बघितले. यावेळी भावाने सदर इसमाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु मारेकरी चाकूचा धाक दाखवून पळून गेला.
या घटनेनंतर कैलासच्या छोट्या भावाने गोडाऊन मालक व ठेकेदार तसेच दौलताबाद पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ व उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतला. तसेच जखमी अवस्थेत कैलास यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून कैलासला मृत घोषित केले. पोलिसांनी परिसरात आरोपीचा माग काढला.
यानंतर पहाटे घटनास्थळी गुन्हे शाखेचे अविनाश आघाव, उपनिरीक्षक कल्याण शेळके, शेख हबीब, नाना पगारे, विजय निकम, दौलताबाद सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. बी. तडवी, ए. एस. राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. कैलासचा खून पगाराच्या पैशावरून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत कैलासच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.