Aurangabad News : शंभर कोटींतून होणार ६१ रस्त्यांची कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation

Aurangabad News: शंभर कोटींतून होणार ६१ रस्त्यांची कामे

औरंगाबाद : महापालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. आर्थिक वर्षे संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना यातील पहिल्या टप्प्याची १०० कोटी रुपयांची निविदा बुधवारी (ता. चार) प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५ कोटींच्या चार निविदा प्रशासनाने प्रसिद्ध केल्या असून, ६१ रस्त्यांची सिमेंट कॉंक्रेटीकरणाची कामे केली जाणार आहे.

महापालिकेने शासन निधी व स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे केली आहेत; पण अंतर्गत रस्त्यांची अद्याप दुरवस्था आहे. त्यामुळे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद रस्त्यांच्या कामासाठी केली होती. त्यानुसार २०७ कोटी रुपये खर्च करून २२४ रस्त्यांची कामे करण्यासाठी यादीही तयार करण्यात आली.

दरम्यान ही कामे टप्प्या-टप्प्याने करण्याचा निर्णय झाला व पहिल्या टप्प्यात १०० कोटींच्या निधीतून ८१ रस्ते करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र श्री. पांडेय यांची बदली झाली व डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासक म्हणून पदभार घेतला. पदभार घेताच डॉ. चौधरी यांनी या निविदांची पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यामुळे निविदा प्रक्रिया थांबली.

प्रशासनाने पडताळणी करून डॉ. चौधरी यांना अहवाल सादर केला. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी शंभर कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा काढण्यास संमती दिली. दरम्यान जुन्या यादील ८१ पैकी काही रस्त्यांची कामे आमदार, खासदार व अन्य योजनांमधून झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे १६ रस्ते वगळण्यात आले.

त्यामुळे ही यादी ६५ रस्त्यांची झाली. आता निविदा प्रसिद्ध करताना ती ६१ रस्त्यांची झाली. बुधवारी या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८० कोटी रुपयांची ही कामे आहेत. प्रत्येकी २५ कोटींची पॅकेज असेल, असे सांगितले जात होते पण प्रत्येकी २० कोटी रुपयांचे हे पॅकेज आहेत. निविदा दाखल करण्यासाठी कंत्राटदारांना २८ जानेवारीपर्यंतची मुदत प्रशासनाने दिली आहे.

असे आहेत चार पॅकेज

पॅकेज रस्त्यांची संख्या रक्कम

पॅकेज १ १२ रस्ते २० कोटी ३० लाख रुपये

पॅकेज २ १७ रस्ते २० कोटी ३८ लाख रुपये

पॅकेज ३ १८ रस्ते २० कोटी १२ लाख रुपये

पॅकेज ४ १४ रस्ते १९ कोटी ७९ लाख रुपये

...तर थेट गुन्हे दाखल करू

महापालिकेमार्फत हाती घेण्यात आलेली कामे नागरिकांसाठी असतात. या कामात अडथळा आणऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, अशा इशारा प्रशासक डॉ. चौधरी यांनी दिला. रमा नगर येथे कचरा संकलन केंद्राला एका संघटनेने टाळे ठोकले आहे. यासंदर्भात विचारणा केली असता डॉ. चौधरी म्हणाले, महापालिकेच्या कामात अडथळा आणऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल इशारा दिला.

शहरातील १६ रस्त्यांवर पडणार उजेड

औरंगाबाद : भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत सहभागी देशांच्या महिलांचे शिष्टमंडळ शहरात येणार आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनामार्फत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

या परिषदेच्या अनुषंगाने १६ रस्त्यांवर पथदिवे लावली जाणार आहेत. त्यावर सुमारे तीन कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (ता. चार) सांगितले.

पत्रकारांसोबत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, की शहरातील ज्या भागातून जी- २० परिषदेचे सहभागी होणारे सदस्य जातील त्या भागातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासोबतच त्या रस्त्यासह इतर ठिकाणी पथदिवे बसविले जाणार आहेत.

तब्बल १६ रस्त्यांवर दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात ११ रस्त्यांवर दोन कोटी रुपये, तर इतर पाच रस्त्यांवर ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.