
औरंगाबाद महापालिकेत फायलींचे ढिगारे, भिंतीही रंगलेल्या; प्रशासक संतप्त
औरंगाबाद : महापालिकेचे नवनियुक्त प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी (ता. पाच) पुन्हा एकदा मुख्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. तब्बल तीन तास पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. या पाहणीत मुख्यालयातील भिंती पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या दिसल्या. अनेक विभागांत फायलींचे गठ्ठे पडले होते. काही ठिकाणी अस्वच्छता होती. हे चित्र पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिकेचे प्रशासक म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी (ता. दोन) पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी महापालिका मुख्यालयातील टप्पा एक व दोन इमारतीमध्ये असलेल्या काही विभागांत जाऊन पाहणी केली होती. काही विभागांत अंधार आढळून आला तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नावांचे फलक नव्हते. त्यामुळे त्यांनी दुरुस्तीची सूचना केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांनी टप्पा क्रमांक तीनमध्ये प्रवेश केला.
नगररचना विभागापासून त्यांनी पाहणीला सुरवात केली. मालमत्ता विभागाकडे जाताना त्यांना पिचकाऱ्यांनी रंगविल्या भिंती दिसल्या. नागरिक, कर्मचाऱ्यांना ये-जा करताना येणाऱ्या अडचणी, रस्त्यात ठेवलेल्या लोखंडी कपाट पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र वॉर्ड अभियंता काशिनाथ काटकर यांना उत्तर देता आले नाही. अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपसंचालक ए. बी. देशमुख, वॉर्ड अधिकारी सुरडकर उपस्थित होते.
थुंकल्यास लागणार दंड
मुख्यालयातील भिंतींवर पान, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश प्रशासकांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसेच इमारतींची रंगरंगोटी, डागडुजी व किरकोळ दुरुस्त्या त्वरित करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
अतिक्रमण हटाव विभागात केवळ एक कर्मचारी हजर
अतिक्रमण हटाव विभागात एक इमारत निरीक्षकच हजर होते. त्यांनीच संपूर्ण माहिती आयुक्तांना दिली. पोलिस किती आहेत, त्यांचा पगार कोण करतो? हे समजून घेतले. झोन क्रमांक एकमध्ये त्यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टीची बिले कशा पद्धतीने दिली जातात. जुने रेकॉर्ड कसे जतन केले आहे? अशी माहिती जाणून घेतली.
महापालिकेत वाहने पार्क करणाऱ्यांवर गुन्हे
महापालिका मुख्यालयातील पार्किंगमध्ये अनेक जण रात्रीच्या वेळी वाहने उभी करतात. त्यावर नाराजी व्यक्त करत प्रशासकांनी सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याचे तसेच रात्री माजी सैनिकांची तैनात करण्याचे आदेश दिले. कोणी दमदाटी करत असेल तर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Web Title: Aurangabad Municipal Corporation Dirt Walls Review By Administrator
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..