Aurangabad : शहरात ‘ग्लो गार्डन’चा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat Karad

Aurangabad : शहरात ‘ग्लो गार्डन’चा प्रस्ताव

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या निधीतून शहरात गुजरातच्या धर्तीवर ‘ग्लो गार्डन’ विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन एकर जागेची गरज असून, जमीन उपलब्ध झाल्यास सुमारे तीन हजार नागरिकांची करमणूक होईल, असे उद्यान विकसित केले जाणार आहे. ‘कलाग्राम’ भागात यासाठी जागेची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे.

शहराचा वेगाने विस्तार होत आहे. जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी दरवर्षी लाखों पर्यटक शहरात येतात. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय वगळता इतर साधने नाहीत.

शहराच्या विविध भागात महापालिकेचे उद्याने आहेत, मात्र या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सलीम अली सरोवरातील बोटींगची व्यवस्था बंद झाल्यानंतर हर्सूल तलावात बोटींग सुरू करण्यासाठी हालचाली झाल्या पण हा प्रस्ताव लालफितीत अडकला.

दरम्यान, आता केंद्र शासनाच्या निधीतून शहरात ग्लो गार्डन विकसित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महापालिकेला दिला आहे.

शहरात मला तुम्ही तीन एकर जागा द्या, मी केंद्राकडून निधी आणून ग्लो गार्डन विकसित करून देतो, असा प्रस्ताव त्यांनी महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना दिला.

गरवारे स्टेडीयम परिसरात कलाग्राम विकसित करण्यात आले आहे, याच परिसरात ग्लो गार्डनसाठी जागा पाहावी, अशी सूचना डॉ. कराड यांनी प्रशासकांना केली आहे. गुजरातसह देशातील अनेक शहरात अशा प्रकारचे ग्लो गार्डन विकसित करण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्लो गार्डन आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.