Aurangabad : जीवन ड्रॉपचे दोन थेंब टाका अन् पाणी शुद्ध करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water

Aurangabad : जीवन ड्रॉपचे दोन थेंब टाका अन् पाणी शुद्ध करा

औरंगाबाद : जवळपास प्रत्येक घरात ‘पाणी शिळे झाले’ म्हणून रोज लाखो लिटर पाणी दररोज फेकून दिले जाते. शहरात एकीकडे पाण्यासाठी ओरड होते तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी फेकल्या जात असल्याचे चित्र आहे. मात्र, पाणी कधीच शिळे होत नाही. पाण्यातील क्लोरिनची मात्रा संपल्यानंतर त्यात जीवजंतू तयार होतात. त्यामुळे जंतू होण्यापूर्वीच क्लोरिनचे दोन थेंब पाण्यात टाकल्यास कितीही दिवस तुमच्या घरातील पाणी स्वच्छ आणि ताजे राहू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे शहराची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत गेल्या काही वर्षात निर्माण झाली आहे. म्हणून शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. सध्या शहराच्या काही भागाला चौथ्या दिवशी तर काही भागाला पाचव्या सहाव्या दिवसी पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या निम्म्या लोकसंख्येला नळाचे पाणी मिळत नाही, असे विदारक चित्र आहे. मात्र, दुसरीकडे ज्या भागात नळ आहेत, तिथे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते.

चौथ्या दिवशी नळाला पाणी येणार असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवतात. ज्या दिवशी पाणी येते त्यादिवशी मात्र, साठवलेले पाणी शिळे झाले म्हणून फेकून दिले जाते. हे पाणी मोजले तर लाखो लिटरच्या घरात जाईल. त्यातून ज्या भागात पाणी नाही, तिथे दिलासा मिळू शकतो. पण पाणी खरेच शिळे होते का? याची अनेकांना माहितीच नसते.

यासंदर्भात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थापत्य विभागाचे निवृत्त प्रमुख तथा अभ्यासक डॉ. उमेश कहाळीकर यांनी सांगितले की, घरात नळाला येणारे पाणी साठवल्यानंतर शुद्ध राहावे यासाठी पाण्यात क्लोरिन मिसळले जाते. हे क्लोरिन किमान तीन ते चार दिवस पाण्यात राहते. हळूहळू ते नाहीसे होते.

दरम्यानच्या काळात हवेतून किंवा हाताच्या माध्यमाने, पाण्यात बुडविल्या जाणाऱ्या भांड्याच्या माध्यमातून जीवजंतू पाण्यात जातात. त्यामुळे साठवलेल्या पाण्यात अळ्या होऊ शकतात. पण त्यापूर्वीच नागरिकांनी प्रत्येक तीन-चार दिवसाला पाण्यात जीवन ड्रॉपचे दोन थेंब टाकल्यास हे पाणी खराब होणारच नाही. परिणामी लाखो लिटर पाण्याची बचत होईल.

धरणात असतो वर्षानुवर्षे पाणीसाठा

घरात साठविलेले चार किंवा पाच दिवसाचे पाणी शिळे झाले म्हणून नागरिक फेकून देतात; पण धरणात वर्षानुवर्षे साठवलेले पाणी असते. हे पाणी शहरात पुरवठा होण्यापूर्वी त्यातील गाळ कमी करणे, जीवजंतू मरून जावेत यासाठी त्रुटी, क्लोरिनचा वापर केला जातो. त्यामुळे नळाला आलेले पिण्याचे पाणी शिळे होत नाही, उलट पाणी २४ तासांनंतर आलेले म्हणजेच एका अर्थी शिळे झालेलेच पाणी पिण्यासाठी जास्त योग्य होय.

नळाला आलेल्या पाण्यात जर काही सूक्ष्म जीवजंतू असतील तर चोवीस तासांमध्ये मृतवत होऊन जातील. म्हणजेच पाणी जास्त शुद्ध होईल. जोपर्यंत पाणी धरण अथवा साठ्याच्या ठिकाणी असते तेव्हा तेथे जीवजंतूंसाठी वनस्पतिजन्य पदार्थ उपलब्ध असू शकतात, त्यामुळे हे पाणी अशुद्ध असते असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महापालिकेने पुरवावे जीवन ड्रॉप

शहरात नळाला येणाऱ्या पाण्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे नागरिक पाणी साठवतात व पुन्हा नळ आल्यानंतर हे पाणी फेकल्या जाते. जोपर्यंत नळाला दररोज पाणी येत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहू शकते. त्यामुळे महापालिकेनेच जीवन ड्रॉप नागरिकांना पुरविले पाहिजे, असे डॉ. कहाळीकर यांनी नमूद केले.