Aurangabad : आचारसंहितेनंतर महापालिकेत नोकर भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad municipal corporation

Aurangabad : आचारसंहितेनंतर महापालिकेत नोकर भरती

औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महापालिकेतील नोकर भरतीचा नारळ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर फुटण्याची शक्यता आहे. तसे संकेत महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. अनुकंपातील ५५ व सरळ सेवा भरतीचे १२३ पदे पहिल्या टप्प्यांत भरली जाणार आहेत.

राज्य शासनाने सेवाभरती नियम व आकृतिबंध मंजूर केल्यानंतर नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात होते. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होऊन दीड वर्षे उलटली आहे पण प्रत्यक्षात नोकर भरती झालेली नाही. यासंदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, नोकरभरतीसाठी महत्त्वाचे असणारे जातीनिहाय प्रवर्ग (रोस्टर) मान्य झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर मार्च महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र त्यापूर्वी महापालिकेचा आस्थापना खर्च जास्त असल्याने विशेष बाब म्हणून राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान महापालिकेने १२३ पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यासोबतच अनुकंपातील ५५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात २०० पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

नोकरभरतीची प्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत राबविली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी नमूद केले. राज्य शासनाने तीन एजन्सींना नोकर भरतीसंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार एजन्सी नियुक्त केली जाईल, या एजन्सीला आवश्‍यक पदांची यादी देऊन नोकर भरतीची प्रक्रिया पार पडली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.

एक हजारापेक्षा जास्त पदे रिक्त

सध्या महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. आकृतिबंधात ९५३ कर्मचाऱ्यांची वाढ झालीआहे तर रिक्त पदांचा विचार करता महापालिका एक हजारापेक्षा जास्त पदांची भरती करू शकते. पण आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची मर्यादा प्रशासनाला पाळावी लागणार आहे.