Aurangabad : महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad municipal corporation

Aurangabad : महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक

औरंगाबाद : शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार केले. पण सततच्या तांत्रिक बिघाडामुळे हे वेळापत्रक कागदावरच राहिले असून, नागरिकांच्या तक्रारी मात्र वाढल्या आहेत. शहराच्या अनेक भागात सहाव्या दिवशीदेखील पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड येत आहे. चार दिवसांपूर्वी ७०० मिलिमिटर व्यासाची पाइपलाइन फुटली होती. ती दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १४ तास लागले. त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत होता पण बुधवारी (ता. २५) झालेल्या अवकाळी पावसाचा पाणीपुरवठ्याला फटका बसला.

फारोळा येथील सबस्टेशनमधील ३३ केव्ही उपकेंद्रातील सीटी कंडक्टर फुटले. त्यामुळे सहा तास शहराचा पाणी उपसा बंद होता. या बिघाडामुळे आगामी तीन दिवसतरी पाण्याचे वेळापत्रक विस्कळित राहणार आहे. महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार केले होते.

शहराचे दोन भाग करून ६० टक्के भागाला तीन दिवसाआड तर ४० टक्के भागाला सहाव्या दिवसी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक १५ दिवसाला या वेळापत्रकात बदल होणार होता. मात्र सततच्या तांत्रिक बिघाडामुळे तीन दिवसाआड मिळणारे पाणी आता सहा दिवसाआड मिळत आहे.

नागरिकांची तारांबळ

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तब्बल पाच-सहा दिवसांनंतर पाणी येत असल्याने हिवाळ्यातच नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिक पाणी नेमके कधी येणार? अशी विचारणा अधिकारी व लाईनमनकडे करत आहेत. पण पाणी कधी येईल याची नेमकी माहिती देताना लाइनमन, कनिष्ठ अभियंत्यांकडे नसल्याचे चित्र आहे.