Aurangabad : पाणीपुरवठ्याच्या कामाचा वेग वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangbad Water Supply

Aurangabad : पाणीपुरवठ्याच्या कामाचा वेग वाढवा

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांच्यातील समन्वयाअभावी संथ गतीने सुरू आहे. मात्र, हे काम पुरेसे मनुष्यबळ, यंत्रणा वाढवून गतीने करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी बुधवारी (ता.२१) दिले.

शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त तथा या संदर्भाने गठित केलेल्या देखरेख समितीचे अध्यक्ष सुनील केंद्रेकर यांनी उच्च न्यायालयात सादर केला. पाणीपुरवठा योजनेच्या कामातील जलवाहिन्या जोडण्याच्या कामावर तोकडे मनुष्यबळ, जलवाहिनी टाकण्यासाठी पुरेशा जेसीबीही आढळून आलेल्या नाहीत, अशी विभागीय आयुक्तांच्या अहवालातील माहिती आहे.

त्यावर खंडपीठाने महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमणे काढावीत, असेही सांगितले. मजीप्रातर्फे खंडपीठापुढे जलवाहिनी मार्गाच्या आड येणारे विद्युत पोल काढण्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील दोन कोटी प्राप्त असून जलकुंभ व भूमिगत कामाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या विश्‍वैश्‍वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत अशी माहिती अॅड. विनोद पाटील यांनी दिली.

या कामाच्या संदर्भाने व्हीएनआयटीशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगताच खंडपीठाने थेट ई-मेलद्वारे संपर्क करण्याचे सांगितले. पत्रव्यवहारच करत बसाल तर पंधरा दिवस जातील, असेही खंडपीठाने सुनावले. अॅड. बजाज यांनी पोलच्या अडथळ्याअभावी काम थांबणार नाही, असे खंडपीठाला सांगितले. महापालिकेकडून एक हजार ३८ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या असून २७० महाअभय योजनेंतर्गत कायम केल्याचे अॅड. संभाजी टोपे यांनी खंडपीठाला सांगितले.

उंदीर दोन की चार पायांचा?

दोन दिवसांपूर्वी एका उंदरामुळे पाणीपुरवठा अकरा तास खंडित झाला होता. त्यावर खंडपीठाने मिश्कील टिप्पणी करताना, उंदीर खरंच दोन पायाचा होता की चार पायाचा हे तपासून पाहावे, असे सांगतिले. गळतीबाबत १९९२ च्या जलवाहिन्यांवर ६ तर १९७५ सालच्या जलवाहिन्यांवर ३ ठिकाणी गळती असल्याची माहिती सादर केल्यानंतर एक गळती थांबवली तर दुसरीकडे सुरू होती. हा प्रकार म्हणजे टॉम अॅण्ड जेरीच्या खेळासारखा आहे. त्यामुळेच गळती त्वरित थांबवावी असे खंडपीठाने स्पष्ट केले.

अकरा जलकुंभांच्या कामाला प्राधान्य

शहरात ५३ जलकुंभ उभारण्यात येत असून, त्यात ३० ठिकाणचे काम सुरू आहे. शहरातील शिवाजीनगर, टीव्ही सेंटर, हिमायतबाग, दिल्ली गेट, खेटला गार्डन, मिसारवाडी, ज्युबिली पार्क, प्रतापनगर, शाक्यनगर, हनुमान टेकडी व पारिजातनगर या भागात ११ जलकुंभ उभारण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार असल्याचेही खंडपीठापुढे सांगण्यात आले.

Web Title: Aurangabad Municipal Water Supply Works High Court Instruction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..