औरंगाबाद : अनधिकृत नळ तोडण्यासाठी दोन पथके नावालाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disconnect unauthorized taps in Ahmednagar city

औरंगाबाद : अनधिकृत नळ तोडण्यासाठी दोन पथके नावालाच

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिन्यांवरील बेकायदा नळ जोडण्या तोडून त्या अधिकृत करून घेण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने तीन पथके स्थापन केली आहेत. मात्र, यापैकी दोन पथकांनी अद्याप एकाही ठिकाणी बेकायदा नळांवर कारवाई केलेली नाही. यामुळे या पथकांच्याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवरील व्यावसायिक अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. मात्र, मध्येच ही मोहीम थांबवली जाते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील अनधिकृत नळजोडण्या तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी येताच शहरातील मुख्य जलवाहिनी आणि फिडरलाइनवरील बेकायदा नळजोडण्या शोधून ते तोडण्यासाठी तीन पथके स्थापन केली.

त्यानुसार मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे हे प्रभाग १, २ आणि ९ चे पथकप्रमुख, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम हे प्रभाग ३, ४ आणि ५ चे पथकप्रमुख, तर उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्याकडे प्रभाग ६, ७ आणि ८ देण्यात आले आहे. या पथकप्रमुखांनी आपापल्या प्रभागांमधील मुख्य जलवाहिनीवर बेकायदा व्यावसायिक नळ शोधून ते तोडून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मुख्य जलवाहिनीवरील बेकायदा घरगुती नळ तोडून ते नियमित करून ते उपजलवाहिनीवर जोडावेत. तसेच नियमित करून न घेतल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिलेले आहेत.

११ बेकायदा नळ काढले

तीन पथके स्थापन केल्यापासून एकच पथक सक्रिय दिसून येत आहे. आदेशानंतर मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वातील या पथकाने आकाशवाणी परिसरात फिडरलाइनवरील ११ बेकायदा नळ बंद केले. शनिवारी (ता.२०) मुख्य पोस्ट कार्यालयाजवळील औरंगाबाद हॉस्पिटलचे सुमारे ४०० मिलिमीटर व्यासाच्या फिडरलाइनवरील बेकायदा नळावर कारवाई केली. या नळास चोवीस तास पाणी सुरू होते. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम व उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्याकडील पथकांकडून एकही कारवाई झाली नाही.

साडेतीन हजार नळ तोडले

सुरवातीला अनधिकृत नळजोडण्या तोडण्यासाठी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली एकच पथक स्थापन केले होते. या पथकाने दोन महिन्यात सुमारे साडेतीन हजार अनधिकृत नळजोडण्या तोडल्या. मात्र, पालिकेच्या अंदाजानुसार शहरात सुमारे लाखभर नळजोडण्या बेकायदा आहेत. त्यानुसार कारवाईला गती देणे आवश्यक मानले जात आहे.

Web Title: Aurangabad Municipality Unauthorized Taps Break Teams Water Scarcity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..