
औरंगाबाद : मोठा दिलासा यंदा तुंबणार नाहीत नाले
औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आल्यामुळे महापालिकेतर्फे नालेसफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिले.
प्रशासक श्री. पांडेय यांनी शुक्रवारी शहरातील नाले सफाईच्या कामाचा आढावा स्मार्ट सिटी कार्यालयात घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त सोमनाथ जाधव, उपायुक्त अपर्णा थेटे, उपायुक्त नंदा गायकवाड, कार्यकारी अभियंता भागवत फड, यांत्रिकी विभागचे उप अभियंता देविदास पंडित, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह वॉर्ड अभियंत्यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रशासक म्हणाले, पाणी साचण्याच्या ठिकाणी निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.
कुठेही पावसाचे पाणी अर्धा तासापेक्षा जास्त पाणी थांबणार नाही, याची काळजी घ्या, नाल्यातून काढलेला गाळ खामच्या बाजूला एका जागेत टाकावा, कचरा नाल्याचा काठावर टाकू नये, गाड्यांची फेऱ्या किती झाल्या, याची पडताळणी होईल. मोठ्या नाल्यांच्या कामांची पाहणी केली जाईल.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आढावा घेतला जाईल. उद्यान विभागाकडून नाल्यांवर १४ ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. ३० नाल्यांवर जाळ्या बसवण्याचे काम लवकरात होईल, असे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.
जूनमध्ये कमल तलावाची सफाई
पाऊस सुरू झाल्यानंतर महापालिकेची यंत्रणा वापरून कमल तलावाची सफाई, रुंदीकरण व खोलीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी इकोसत्त्व ही संस्था महापालिकेला मदत करणार आहे, असे पांडेय यांनी सांगितले. तलावाची सीमा निश्चित करून नाल्यात सोडले जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद करावे, अशी सूचना त्यांनी केली.
दीड महिन्यापूर्वी सुरू झाले होते काम
नाले सफाईचे काम दीड महिनाभरापूर्वी मार्चमध्ये सुरू झाले होते. शहरात ११५ किलोमीटरचे अंतराचे नाले आहेत. ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यंदा देखील ठेकेदार न लावता महापालिकेची यंत्रणा वापरून नाले सफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे पैशांची बचत झाल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला.
Web Title: Aurangabad Nala Cleaning Work Is 80 Percent Complete 31may Deadline
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..