Aurangabad : डॉ.नागनाथ कोतापल्ले: मराठवाड्याचा वाङ्मयीन अध्वर्यू ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.Nagnath Kotapalle

Aurangabad : डॉ.नागनाथ कोतापल्ले: मराठवाड्याचा वाङ्मयीन अध्वर्यू !

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

मराठी वाङ्मयाच्या साठोत्तरी मांदियाळीतील जेष्ठ लेखक, कवी, समीक्षक, कथा-कादंबरीकार माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले सरांच्या निधनाची बातमीने खूप दु:ख झाले! एक एक प्रेमळ मनाचा सहृदय शिक्षक म्हणजेच आज आपल्यातून निघून गेला! माध्यमांवर सर्वत्र सरांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे, जेष्ठ-श्रेष्ठ लेखक-साहित्यिकांचे शोक संदेश वाचतांना अक्षरशः मन हेलावून गेले! विकासापासून वंचित असणाऱ्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या दुर्गम भागातून आलेला एक लेखक आज काळाच्या पडद्याआड गेला! महाराष्ट्राच्या इतिहासांत मराठवाड्याने भरीव योगदान दिले,

परंतु विकासाच्या बाबतीत मराठवाड्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षित जीनं आलं! अनेक नेत्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊन ठेवल्यानंतर वाढून घ्यायच्या वेळेला त्यांनी जगाचा निरोप घेतला! आद्य कवयित्री संत जनाबाई, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत नामदेव, पासोडीकार दासोपंत आदि कवी अजूनही उपेक्षितांचं जिणं जगताहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठवाड्यातील अनेक तत्वज्ञ, कवी, लेखक, नाटककार, लोककवी, कलावंत, प्रबोधनकार,

कादंबरीकारांनी उपेक्षिताचं जगणं अनुभवलेलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शहरी झगमगाटात गुंगून गेलेलं लेखनविश्व कधी मराठवाड्यात विसावलंच नाही! रंगविलेल्या बटबटीत, गडद सौंदर्यानं कधी गावरान-ग्रामीण निखळ सौंदर्य अनुभवलंच नाही! ते कायम उपेक्षित राहिलं! याच उपेक्षित महानुभावांच्या मांदियाळीतील एक नाव म्हणजे कवी-कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले!      

कविवर्य डॉ.नागनाथ कोतापल्ले सरांच्या जीवन-जगण्याचा इतिहास त्यांच्या साहित्यातून दृगोचर होतांना त्यांचे लेखनभावविश्व हे तंत्रापेक्षा आशयाला महत्व देतांना समाजाला त्याचा खराखुरा आरसा दाखवण्याचे नित्य कार्य करते. कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी सरांकडून कवितेचे बाळकडू घेतलेले कोतापल्ले इथल्या व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगून इथल्या प्रस्थापितांना सडेतोड प्रश्न विचारून पळताभुई थोडी करतात. स्वातंत्र्याच्या आसपास जन्मलेल्या कोतापल्ले सरांनी बहात्तरच्या दुष्काळाच्या झळाबरोबरच गरिबी, जातिभेदाचे खोलवर चटके सोसले होते!

याचा परिणाम असा झाला की; त्यांची लेखणी महात्मा ज्योतीराव फुल्यांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वसा-वारसा सांगते. साठोत्तरी मराठी वाङ्मय विश्वात सर्वच क्षेत्रांत कोतापल्ले सरांनी आपले भरीव योगदान देतांना आपल्या मूळ विचारांच्या बैठकीशी कधीही प्रतारणा केलीं नाही. त्यांचा पहिला आणि एकमेव असलेला 'मूड्स' हा कविता संग्रह आणि त्यातील कविता त्यांच्या लेखनाचे भावविश्व सहज प्रकट करतांना हा कवी मराठी सास्वतांच्या मांदियाळीत नक्की जाऊन बसणार याची मनोमन साक्ष पटते. कोणत्याही कवीची कविता ही त्याच्या अंतकरणाचे निखळ भाव असते. सत्तरीत त्यांची हे शहर म्हणजे एक प्रचंड अजगर आहे

येथे जगण्यासाठी मरणाची तिरडी आळवावी लागते

अशा आशयाची कविता सुर्वे, चित्रे, महानोर, ग्रेस, तांबोळी यांच्या कवितेची जातकुळी सांगून जाते. नवनवी जीवनक्षितिजे समाजात प्रतिबिंबित होतांना समजातील दु:ख, वेदना आणि वैफल्यग्रस्तता इत्यादी मूल्याची पेरणी करतांना त्यांची कविता स्वतःची नवी वाट निर्मिते. त्यांच्या एकाच कविता संग्रहात आशयाची उंची आणि भावनांची मर्मग्राह्यता ओतप्रोत भरलेली आढळते.           

एकुलता एक कवितासंग्रह प्रकाशित केल्यानंतर कोतापल्ले सर इतर वाङ्मयीन लेखन प्रकाराकडे वळले. त्यांच्या मनातील भावभावनांना विस्ताराने व्यक्त होण्यासाठी कवितेचा परीघ छोटा वाटत असावा, परिणामी सर इतर साहित्य प्रकारात लिहू लागले. कोतापल्ले सरांची जडणघडण प्रथितयश साहित्यिकांमध्ये झाल्यामुळे त्यांचे लेखन आशय-विषय संपन्न झाले. देगलूर येथे महाविद्यालयीन स्तरावर प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी आणि औरंगाबाद येथील तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठ स्तरांवर नामवंत साहित्यिक प्रा.वा.ल.कुलकर्णी, प्रा.यु.म.पठाण, डॉ.सुधीर रसाळ, डॉ.गो.मा. पवार या दिग्गजांचा सहवास लाभला.

त्याशिवाय आंबेडकरी साहित्याचे हृदयस्थ गुरुवर्य डॉ.गंगाधर पानतावणे सरांचा स्नेहबंध त्यांना आणखीनच समृद्ध करून गेला. गावाकडील शेती-मातीचे अनुभव असणारे नागनाथ कोतापल्ले कथा लेखनामध्ये गढून गेले. एकीकडे बीडच्या बंकटस्वामी वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्ययन-अध्यापन करतांना ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न त्यांना स्तंभित करायचे. बीड हा मागास, उसतोड कामगारांचा जिल्हा आणि कोतापल्ले सर शेतकरी कुटुंबातून आलेले, परिणामी त्यांची नाळ पटकन बीड परिसराशी जुळली. अत्यंत खंबीर व निर्भय स्वभावाच्या कोतापल्ले सरांना अनेक संधी चालून आल्या.

त्यातच ते औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वाङ्मयीन प्रवास सुरु झाला. १९८० नंतरच्या मराठी कथेतील भास्कर चंदनशिव, आनंद पाटील, प्रतिमा इंगोले, बाबाराव मुसळे या प्रथितयश कथाकारांच्या पंगतीत डॉ.नागनाथ कोतापल्ले जाऊन बसतात. ऐंशीच्या दशकांत देशात विकासाने जोर धरला आणि याचे पर्यवसान धर्म, संस्कृती, परंपरा, कौटुंबिक नात्यांची पडझड होण्यात झाले. माणसाने आत्मकेंद्रित विश्व निर्माण केले आणि समाजाच्या आनंदाचा डोल्हारा कोसळायला प्रारंभ झाला. पती-पत्नीचे संबंध स्त्री-पुरुषाचे संबंध झाले आणि कुटुंब विभक्ततेचे प्रमाण वाढायला लागले.

या सर्वच बदलत्या सामाजिक कंगोऱ्याचे चित्रण डॉ.कोतापल्ले सरांच्या कथांमधून आपणास वाचायला-अनुभवायला मिळते. आपले विलक्षण अनुभव प्रतिमा आणि प्रतीकांच्या सहाय्याने मोठ्या विलोभनीय पद्धतीने मांडून आपल्या कथेची मांड समाज आणि वाचकाच्या मनावर घट्ट करून जातात. मानवी व्यथा, वेदना, विसंगती, शून्यता, न्यूनता, एकाकीपण, दुख, कष्ट, अनोळखीपणा, दारूनता, ढासळती सामाजिक मुल्ये हे त्यांच्या कथांमध्ये पावलोपावली अनुभवायला मिळते.

  याशिवाय कोतापल्ले सरांनी दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा अशा सर्वच वाङ्मयीन परिपेक्षामध्ये आपले अमूल्य योगदान दिलेले आढळून येते. 'कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ हे कथासंग्रह, ‘राजधानी’ हा दीर्घकथा संग्रह, ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबऱ्या, ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य :स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’  आदि समीक्षणात्मक ग्रंथ, ‘गावात फुले चांदणे’ ही प्रौढ लघुकादंबरी, ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ हे ललित गद्य ग्रंथ , ‘जोतीपर्व’अनुवादित ग्रंथ आणि 'स्त्री-पुरुष तुलना', 'शेतकऱ्यांचा आसूड', 'पाचोळा आणि दहा समीक्षक', 'निवडक बी रघुनाथ' आदि महत्वपूर्ण वाङ्मयीन कलाकृतींचे संपादन करण्याचे भीष्मकार्य डॉ.कोतापल्ले सरांनी आपल्या तहहयातीत केले. त्यांना विविध पाच पुरस्कारांनी गौरवले गेले.

आज आदरणीय कवी-कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले सर आपल्यात नाहीत ही मोठी दु:खद बाब आहे. मराठी वाङ्मयीन परीघ विस्तारण्यासाठी सरांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले असले तरी म्हणावा तेव्हढा त्यांच्या लेखनाचा उहापोह झाला नाही हे मोठ्या धाडसाने म्हणावे लागते. आज नव्या पिढीने त्यांच्या सर्वच लेखनाचा धांडोळा घेऊन त्यावर अनेक समीक्षणात्मक लेखन होणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर 'समग्र नागनाथ कोतापल्ले' नावाचा एक ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करणे अगत्याचे आहे.

असे झाल्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना मराठवाड्याच्या या भूमिपुत्राच्या वाङ्मयाची विस्ताराने ओळख होईल. नव्या पिढीतील अनेक वाचक-लेखक-संशोधक डॉ.कोतापल्ले सरांच्या वाङ्मयावर संशोधन करतील. यातूनच १९६० नंतरच्या मराठवाड्याची ओळख कायम राहील! असा समग्र ग्रंथ शासनाने प्रकाशित करून स्मृतिशेष डॉ.नागनाथ कोतापल्ले या मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा सन्मान करावा, हीच खऱ्या अर्थाने आदरणीय गुरुवर्य डॉ.कोतापल्ले सरांना खरी श्रद्धांजली असेल! जय हिंद!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये