
औरंगाबाद : इटावाच्या सरपंचपदासाठी उमेदवार मिळेना!
वाळूजमहानगर : वैध जात प्रमाणपत्र सादर न केल्याने रिक्त झालेल्या इटावा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. मात्र त्यातही जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सरपंचपदाची निवडणूक रखडल्याने अध्यासी अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक न घेता परत जावे लागले. हा प्रकार वाळूज परिसरात पहिल्यांदाच घडल्याने चर्चा होत आहे.
इटावाचे सरपंचपद एसटी संवर्गासाठी राखीव आहे. तत्कालीन सरपंच रंगीता देवबोने यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने या पदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम ठरला. त्यामुळे अध्यासी अधिकारी तथा तुर्काबाद सजाचे मंडळ अधिकारी ए. व्ही. साबदे, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे हे ठरलेल्या वेळेत इटावा ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले. यावेळी ठरलेल्या वेळेत सरपंच पदासाठी सुनीता कैलास शिनगारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
या अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये शिनगारे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जातपडताळणी समितीकडे जात पडताळणीबाबत २४ मे २०२२ ची पोचपावती सादर केली. तसेच जातप्रमाणपत्र कोळी महादेव या जातीचे उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे छायाप्रत सादर केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळ मिळावा. असा लेखी विनंती अर्ज सादर केला.
शासन राजपत्र २० सप्टेंबर २०१९ चे सादर केले. जात पडताळणी समितीचे जातवैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक होते. ते न जोडल्यामुळे शिनगारे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. शिवाय सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी एकही अर्ज शिल्लक न राहिल्याने इटावा ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड न करता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना परत जावे लागले.
कोरम पूर्ण मात्र निवडणूक नाही येथील सदस्यसंख्या ८ आहे. त्यापैकी या सभेसाठी रामकिसन म्हस्के, रूपेश जाधव, अण्णा गांगुर्डे, सुनीता कैलास शिनगारे, रंजना बळवंत सूर्यवंशी, सुवर्णा बबन गव्हाणे हे ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. तर वंदना बाबासाहेब घुले, नरसिंग रामसिंग माळी हे अनुपस्थित राहिले. मात्र कोरम पूर्ण असल्याने मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. केवळ जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने येथील सरपंचपदाची निवडणूक होऊ शकली नाही.
Web Title: Aurangabad No Candidate For Etawah Sarpanch Post Election Stalled Due To Caste Certificate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..