‘डॉक्टरी’ची सोडली कास सेंद्रिय शेतीचा ध्यास!

७० एकरवर यशस्वी प्रयोग, १०० गीर गायींचाही सांभाळ!
डॉ. सीताराम जाधव
डॉ. सीताराम जाधव sakal

कन्नड : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतजमिनी नापीक होत आहेत. शिवाय अशा शेतात पिकलेले धान्य, भाजीपाल्यात रासायनिक घटकांचे अंश उतरतात, त्याचा आरोग्याला मोठा धोका आहे. त्यामुळे सेंद्रिय, शाश्‍वत शेतीकडे समाजाची पावले वळू लागली आहेत. कन्नड तालुक्यातील (जि. औरंगाबाद) डॉ. सीताराम जाधव यांनी तर आपला ३५ वर्षांचा सुस्थितीत असलेला वैद्यकीय व्यवसाय सोडून सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. या शेतीला देशी गोशाळेची जोड देत त्यांनी पथदर्शक असा प्रकल्पच उभारला आहे.

डॉ. जाधव हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. १९७२ च्या दुष्काळानंतर मानवी आजारांचे स्वरूप बदलले. कमी वयात वेगवेगळे आजार जडत आहेत. याचा शोध घेतला असता, १९७२ च्या दुष्काळानंतर मानवी जीवनशैलीत, शेती पद्धतीत परिवर्तन झाले. रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. संकरित गायी आल्या. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य, दुधामध्ये भेसळ वाढली. त्यामुळे कमी वयात उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आदी आजारांचे रुग्ण वाढायला लागले. त्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला, यशस्वीही करून दाखविली.

डॉ. जाधव यांची अंबाडी धरणानजीक ७० एकर पडीकच नव्हे, तर खडकाळ जमीन आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांचे या शेतीकडे फारसे लक्ष नव्हते. सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी या शेतीचे रूपच पालटले. सेंद्रिय शेतीसाठी देशी गायींचे पालन फायदेशीर ठरते, म्हणून ते शंभर गीर गायींचे संगोपन करीत आहेत. त्यासाठी गोशाळा उभी केली आहे.

गोशाळेचे फायदे

जर्सी गायीचे दूध ए-१ असते, ज्यामुळे असंख्य आजार उद्भवतात. भारतीय संस्कृतीत दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. विशेषतः देशी गायींचे दूध ए-२ असते, जे प्राशन केल्यास शरीराला आवश्‍यक असलेली ९ प्रकारची अमिनो आम्ले मिळतात. शिवाय खनिजांसह इतरही अनेक घटक मिळतात. त्यामुळे ८० प्रकारचे आजार उद्भवत नाहीत. डॉ. जाधव यांना उभ्या केलेल्या देशी गोशाळेतून ए-२ दूध, दही, ताक, तूप तसेच गोमूत्र, शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. यामुळे ७० एकर शेती पूर्णतः जैविक पद्धतीने करण्यात येते. गोमूत्र एका टाकीत जमा करण्यात येते. त्यानेच गोशाळा स्वच्छ केली जाते. जीवामृतही केले जाते. दशपर्णी, नीम अर्क, गांडूळ खतासोबतच सर्व प्रकारचे खते जैविक पद्धतीने तयार करतात. बोरॉन, युरिया, कॅल्शिअम, झिंक आदी पिकांना आवश्यक असलेले घटक जैविक पद्धतीने तयार केले जातात. जीवामृत छाननी प्रकल्प उभा केला आहे. एरोबिक कंपोस्ट बॅगमध्ये शेतीतील कोणताही उरलेल्या घटकांचे विघटन करून पिकांसाठी उपयुक्त खतही तयार केले जाते.

सेंद्रिय शेतीवरच आंबा, सफरचंद, फणसही

डॉ. जाधव यांच्या या प्रगोगात खते, कीटकनाशके विकत आणावी लागत नसल्याने अनावश्यक खर्च वाचला. शिवाय शेणखत, काडी कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पही सुरू केला आहे. जैविक शेतीसाठी लागणारे मिक्सर घरीच तयार केले आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब करून त्यांनी आंबा, सफरचंद, फणस आदींची लागवड केली आहे. भाजीपाला, उसासह इतर पिकेही ते घेत आहेत.

समाजाला आजारमुक्त, वेदनामुक्त करण्यासाठी सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करावीच लागेल. कमी खर्च आणि सर्वार्थाने ही लाभदायी शेती आहे. विषमुक्त शेतीची कास धरली तरच मानवाचे भले होईल. कोरोनाने सर्वांना सावध केले आहे. आगामी काळात कोरोनापेक्षाही अधिक भयानक आजारांची शक्यता नाकारता येत नाही. अशा आजारांशी लढण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही

-डॉ. सीताराम जाधव,स्त्रीरोगतज्ज्ञ तथा प्रगतिशील शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com