Aurangabad : ‘संभाजीनगर’च्या भोवती ३४ वर्षे फिरले राजकारण! Aurangabad Politics revolved around Sambhajinagar 34 years | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajinagar

Aurangabad : ‘संभाजीनगर’च्या भोवती ३४ वर्षे फिरले राजकारण!

औरंगाबाद : औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करावे यासाठी मागील ३४ वर्ष राजकारण झाले. याच मुद्द्याभोवती औरंगाबाद महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविल्या गेल्या. त्यानंतर आता केंद्र सरकारने औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता श्रेयाच्या लढाईलासुद्धा सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद महापालिकेत १९८८ मध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’चा नारा दिला होता. तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करते. भाजपसह मनसेही ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करीत आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक १९८८ पासून ‘संभाजीनगर’ नावाभोवतीच गाजत आहे. १९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली होती. औरंगाबाद महापालिकेने १९ जून १९९५ रोजी हा ठराव मंजूर केला. केवळ महापालिकाच नव्हे तर; जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्येही हे नाव बदलण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशीव’चा ठराव घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरणाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठविले होता. त्याच प्रस्तावाला आता केंद्राने मंजुरी दिली आहे.

उस्मानाबादला पुन्हा जुन्या नावाची ओळख

उस्मानाबाद, ता. २४ ः महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी हा निर्णय रद्द करून नव्याने प्रस्ताव आणत नामकरणाचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काहीजण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते.

न्यायालयात हे प्रकरण सुरू असून केंद्र सरकारच्यावतीने गेल्याच आठवड्यात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केंद्राने ‘धाराशिव’ला मान्यता दिल्याचे न्यायालयात सांगितले होते.

उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणी तब्बल २५ वर्षांपूर्वी शिवसेनेने केली होती. २५ मे १९९५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नामांतराची प्रथम घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. या निर्णयाविरुद्ध दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत नामांतराला स्थगिती मिळविली.

२००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख

यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द केला. औरंगाबाद खंडपीठाने याचिका निकाली काढली.

ग्रामदेवतेच्या नावाचा पुरावा

निजामाने मराठवाड्यातील शहरांची नामांतरे केली, त्यात उस्मानाबाद शहराचा समावेश आहे. उस्मानाबादचे जुने नाव धाराशिव असे असल्याचे काही पुरावे आहेत. गावचे ग्रामदैवत असलेल्या धारासूर मर्दिनी देवीच्या नावावरून ‘धाराशिव’ असल्याचे पुरावे सापडतात.

पण निजामशाहीमधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या काळात धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही काही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एकमध्ये उस्मान अली खानने १९०० मध्ये ‘धाराशिव’चे उस्मानाबाद केल्याचा उल्लेख आहे.