
औरंगाबाद : वैद्यकीय सेवेत हलगर्जीपणा नकाे
देवगाव रंगारी : ग्रामीण भागातील जनतेसाठी शासनाने वैद्यकीय क्षेत्रात अनेक योजना आणल्या असून त्या सेवा सर्वसामान्य जनतेस मिळाव्यात, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या. वैद्यकीय सेवा देताना हलगर्जीपणा चालणार नाही, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवगाव रंगारी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना दिला.
रविवारी रात्री एका खासगी कार्यक्रमासाठी देवगाव रंगारी येथे आले असता त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती घेतली. ग्रामीण रूग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन येथील सोयी, सुविधांबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. नीलेश अहिरराव यांच्याकडून माहिती घेतली. येथील परिस्थिती पाहून आरोग्य प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. सन २००९ मध्ये ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळूनही अद्याप ग्रामीण रुग्णालयाची कुठलीही सेवा रुग्णांना मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच येथील एक्स रे मशीन, दंत विभागाचे मशिन यांना तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले.
बारा वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत ग्रामीण रूग्णालय मंजूर झाले. परंतु अद्याप पर्यंत येथे कोणतीही सुविधा नाही हे चांगले नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, आरोग्याच्या संदर्भात हेळसांड योग्य नाही, पुढील आठ महिन्याच्या काळात अद्ययावत आधुनिक सेवा सुविधांसह भव्य इमारतीसाठी आघाडी शासनाने निधी दिलेला असून लवकरच ते काम पूर्ण होईल, तसेच देभेगांव येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्याचाही त्यांनी शब्द दिला.
जाताना मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णसेवेत जाणीवपूर्वक कोणीही व्यवस्थित कामे करीत नसतील तर हे योग्य असणार नाही, असे खडसावले. याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगटगावकर, संतोष कोल्हे, अनिल पाटील सोनवणे, शिवाजी काकडे, अजय काकडे, राजकुमार गंगवाल, बाळासाहेब संचेती, गोकूळ गोरे, सुशीलकुमार गंगवाल, नारायण बोडखे, मंगेश पाटील सोनवणे, शकिल कुरैशी, राजीव साळुंके, रिखब पाटणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार नको सुविधा द्या
येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती बघता संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामीण रुग्णालय व रुग्णकल्याण समितीतर्फे करत येणाऱ्या सत्कारास त्यांनी नकार देत आधी सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, सर्व मशिनरी बसवा, रिक्त जागा भरा त्यानंतर सत्कार करावा असेही यावेळी मंत्री टोपे यांनी ठणकावले.
Web Title: Aurangabad Provide All Medical Services Rajesh Tope
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..