Aurangabad : उद्धव ठाकरे यांच्या ताकदीला ते घाबरले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danve

Aurangabad : उद्धव ठाकरे यांच्या ताकदीला ते घाबरले!

औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मोठी ताकद पुढे येत आहे, त्याला घाबरून ‘ते’ एकत्र येत आहेत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दीपोत्सवानिमित्त एकत्र आलेल्या नेत्यांना लगावला.

अंबादास दानवे यांनी शनिवारी (ता.२२) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाला शुक्रवारी मुंबईत राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते.

त्यामुळे नव्या महायुतीची चर्चा सुरू झाली. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता श्री. दानवे म्हणाले, की ते तिघे एकत्र येत आहेत याचा अर्थ उद्धव ठाकरे यांची ताकद वाढत आहे. त्यांनी संस्कृतीच्या नावाखाली अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून पळ काढला.

हदगाव, कोल्हापूर, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांची संस्कृती कुठे गेली होती? उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ‘ऑरिक’ला भेट दिली, यावेळी त्यांनी ‘ऑरिक’मध्ये मोठी गुंतवणूक आणण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने प्रयत्न केले नाहीत असा आरोप केला. याबद्दल पत्रकारांनी दानवे यांना विचारले असता म्हणाले,‘ सामंत यांनी एमआयडीसीच्या भूखंडांना स्थगिती का दिली होती हे आधी स्पष्ट करावे.

मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठवल्याचे १९ सप्टेंबर रोजी जाहीर केले; पण प्रत्यक्षात स्थगिती १९ ऑक्टोबरला उठली, असे का झाले याचे उत्तर देखील सामंत यांनी दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

माझ्यामुळेच तनवाणींची नियुक्ती

किशनचंद तनवाणी यांना आपण जिल्हाप्रमुख केले असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणत आहेत. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मीच दहा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली होती. विरोधी पक्षनेता असल्यामुळे मला पुरेसा वेळ देता येणार नाही, त्यामुळे माझ्याकडचा पदभार कमी करा, असे मी म्हटले होते.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी किशनचंद तनवाणी यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती माझ्यामुळे झाली, त्यात श्री. खैरेंचे काही योगदान नाही, असे दानवे म्हणाले. जिल्हाप्रमुखांची नियुक्ती पक्षप्रमुखच करीत असतात, असा उल्लेखही त्यांनी केला.