औरंगाबादेत शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण; शिवभक्तांची गर्दी

औरंगाबादेत क्रांती चौकात उभारलेल्या देशातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून अनावरण करण्यात आले.
Shivaji Maharaj
Shivaji Maharaj Sakal
Updated on

औरंगाबाद : फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, लाईट शोचा लखलखाट आणि हातात भगवे ध्वज घेऊन लाखोंच्या संख्येने उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूट उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी (ता. १८) रात्री अनावरण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने यावेळी आसमंत दुमदुमला. शिवरायांचे शिवतेच पाहण्यासाठी क्रांती चौकात जमलेल्या विक्रमी अलोट गर्दीच्या डोळ्याचे पारणे फिटले. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Aurangabad)

महापालिकेने क्रांती चौकात उभारलेल्या देशातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून अनावरण करण्यात आले. व्यासपीठावर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार सतीश चव्हाण, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांती चौकातील शिवयारांचा पुतळा भव्यदिव्य असल्याने कार्यक्रमाची देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. पुतळ्याला सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सायंकाळपासूनच क्रांती चौकात गर्दी झाली. पोलिसांनी सिल्लेखाना, दूधडेअरी चौक, जिल्हान्यायाल व गोपाळ टी हाऊस चौकात रस्ते बंद केले होते. क्रांती चौकापासून हे चारही रस्ते शिवप्रेमींनी गजबजून गेले. हातात भगवे ध्वज, जयभवानी जय शिवाजीच्या घोषणा देत तरुण, तरुण, महिला-पुरुषांनी प्रचंड गर्दी केली. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांचे आगमन झाले. श्री. ठाकरे यांनी शिवप्रभुंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली. त्यानंतर लाईट आणि साउंड शो सुरु झाला व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. लाईट आणि साऊंड शो व फटाक्यांच्या आतषबाजीने क्रांती चौकचा परिसर फुलून गेला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा हातात भगवा झेंडा घेवून त्यांनी तो फिरवला. त्यानंतर शिवप्रेमीं ठेका धरला. अनेकांनी चारचाकी वाहने, परिसरातील इमारती, अग्निशमन, पोलिसांच्या वाहनांवरच चढून हा ऐतिहासिक सोहळा पाहिला. क्रांती चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर एक ते दीड किलोमीटरपर्यंत शिवप्रेमींची अलोट गर्दी होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रंचड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. महिला, मुलींना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन आयोजकांकडून वारंवार केले जात होते.

स्वतंत्र व्यासपीठामुळे तणावाचे वातावरण

महापालिकेने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम रात्री १२ वाजता ठेवल्याने त्यास शिवजयंती उत्सव समिती, विविध संघटनांनी विरोध केला होता. तसेच हा कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केल्याचा आरोप होत होता. त्याचे पडसाद अनावरण कार्यक्रमात देखील उमटले. जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे व महापालिकेचे व्यासपिठ समोरासमोर होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येण्याचे उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळले. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी व उत्सव समितीच्या व्यासपीठावर उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्यात घोषणाबाजीची जुगलबंदी लागली. डीजेच्या आवाजाने एकमेकांवर मात करण्याचा देखील प्रयत्न झाला. अखेर शिवप्रभुंच्या पुतळ्याचा मान राखत उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेसह घोषणाला थोडा विराम दिला. अनावरणाचा नंतर पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com